एकीकडे फिटनेसबाबत किंवा आहाराबाबत जागरूकता वाढत असली तरी बदलत्या लाइफस्टाइलमुळे आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या निर्माण होत आहेत. लोकांच्या शारीरिक क्रिया कमी झाल्याने त्यांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागताना दिसतोय. अशात एका रिपोर्टनुसार, देशातील ५३ टक्के महिलांची शारीरिक अॅक्टीविटी गरजेपेक्षा कमी आहे. पुरुषांची स्थितीही फारशी चांगली नाहीये. तब्बल ४८ टक्के पुरुषांची शारीरिक क्रिया कमी आहे. बंगळुरुच्या एका फिटनेस अॅपने नुकताच एक सर्व्हे केला होता. त्यातून हा खुलासा झालाय. या सर्व्हेनुसार, बंगळुरु, गुरुग्राम येथील लोक त्यांच्या आरोग्याबाबत सर्वात जास्त सतर्क आहेत. तर कोलकाता, लखनौ आणि अहमदाबादचे लोक आरोग्याकडे सर्वात कमी लक्ष देतात.
HealthifyMe या फिटनेस अॅपने २५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या जवळपास १० लाख भारतीयांच्या आरोग्यासंबंधी सवयींवर सर्व्हे केला. आणि त्या आधारावर 'फिजिकल अॅक्टिविटी लेव्हल ऑफ इंडियंस' नावाचा रिपोर्ट तयार केला. यातून असं आढळून आलं की, फिजिकल अॅक्टिविटीसोबतच महिला कॅलरी बर्न करण्यातही पुरुषांच्या मागे आहेत.
महिलांनी एका दिवसात सरासरी जितक्या कॅलरी बर्न करायला हव्यात, त्याच्या केवळ ४४ टक्के कॅलरी त्या बर्न करू शकतात. तेच पुरुष एका दिवसात साधारण ५५ टक्के कॅलरी बर्न करण्यात यशस्वी ठरतात. रिपोर्टनुसार, महिलांनी एका दिवसात सरासरी ३७४ कॅलरी बर्न करायला हव्यात. पण यातील त्या केवळ १६५ कॅलरीच बर्न करु शकतात. तर पुरूषांनी एका दिवसात सरासरी ४७६ कॅलरी बर्न करायला हव्यात. पण ते त्यातील जवळपास २६२ कॅलरी बर्न करतात.
कॅलरींचा थेट संबंध हा शारीरिक क्रियेंशी असतो. सर्व्हे करणाऱ्या अॅपचे अधिकारी तुषार वशिष्ठ यांनी सांगितले की, 'ही फार चिंतेची बाब आहे की, देशातील अर्धी लोकसंख्या गरजेच्या फिजिलक अॅक्टिविटीच करत नाहीत. जर आपण देशातील महिला आणि पुरुषांना मिळून सांगितलं जर प्रत्येक व्यक्ती गरजेच्या फिजिकल अॅक्टिविटीचं केवळ ५० टक्केच लक्ष्य मिळवू शकतात.
याच सर्वात मोठं कारण आहे रोजच्या वाईट सवयी आणि आहारात पौष्टिक पदार्थांचा समावेश नसणे, याच सवयींमुळे जाडपणा, हायपरटेंशन, डायबिटीजसारखे आजार होतात. सर्व्हेमधून आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. फिजिकल अॅक्टिविटीचा ३० वयोगटाच्या आसपास असलेल्या लोकांमध्ये फारच खराब स्तर आहे.
सर्व्हे करणाऱ्या अॅपने वेगवेगळ्या शहरातील लोकांचे फिटनेस बॅंड किंवा फोनमधील फिटनेस अॅपचा डेटा गोळा करून त्या आधारे निष्कर्ष काढले. यातून हेही समोर आलं की, मोठ्या शहरातील लोक एक दिवसात सरासरी ४०७ कॅलरी बर्न करतात. तेच लहान शहरातील लोक एक दिवसात सरासरी ३७१ कॅलरी बर्न करू शकतात. म्हणजे मोठ्या शहरातील लोक छोट्या शहरातील लोकांपेक्षा अधिक अॅक्टिव आहेत.