नवी मुंबई- 15 फेब्रुवारी 2021 : नवी मुंबईतील खारघर येथे राहणाऱ्या सीमा रमेश म्हात्रे, वय वर्षे 58, या महिलेला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे 16 जानेवारी 2021 रोजी नवी मुंबईतील ‘रिलायन्स हॉस्पिटल’च्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्याने या रुग्णाच्या हृदयाच्या आत एक छिद्र पडले आणि त्यामुळे ‘व्हेन्ट्रिक्युलर सेप्टल रप्चर’ (व्हीएसआर) नावाची एक दुर्मिळ आणि जीवघेणी स्थिती निर्माण झाली होती, असे तिच्या तपासणीत दिसून आले. डॉ. कमलेश जैन यांनी आपल्या शल्यक्रियेतील कौशल्याने या रुग्णावर अतिजोखीम असलेली, तातडीची शस्त्रक्रिया केली आणि तिचे प्राण यशस्वीपणे वाचवले. या मोठया शस्त्रक्रियेनंतर ही महिला आता बरी झाली असून, तिला घरी सोडण्यात आले आहे. तिची प्रकृती सुधारत आहे.
‘व्हीएसआर’ ही एक दुर्मिळ व प्राणघातक स्वरुपाची शरीरातील गुंतागुंत आहे आणि शस्त्रक्रिया हाच यावर एकमेव प्रमाणित उपचार आहे. या आजारात हृदयाचे स्नायू अतिशय कमकुवत झाले असल्याने त्यास छिद्र पडलेले असते. ते छिद्र बुजवून त्या स्नायूंना फार नाजूकपणे टाके घालावे लागतात. त्यामुळेच ही शस्त्रक्रिया फार आव्हानात्मक असते. ‘व्हीएसआर’वर उपचार फार क्लिष्ट असतात. त्यामध्ये अति काळजी घेण्याला महत्त्व असते. तसेच, इमेज घेणे, उपचार करणे आणि शस्त्रक्रिया करणे यांबाबतीतही अति कौशल्यांची आवश्यकता असते. ही शस्त्रक्रिया करताना रुग्ण दगावण्याचे प्रमाण खूप जास्त आहे. खरे तर, हृदयावर करण्यात येणाऱ्या इतर कोणत्याही शस्त्रक्रियांपेक्षा, या विशिष्ट शस्त्रक्रियेच्या दरम्यान रुग्ण मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे.
रिलायन्स हॉस्पिटल, नवी मुंबई येथील ‘कार्डिओव्हॅस्क्युलर थोरॅसिक सर्जन’ डॉ. कमलेश जैन म्हणाले, “व्हीएसआरच्या स्थितीतील वृद्ध रुग्णांचे जगण्याचे प्रमाण खूपच कमी असते. या परिस्थितीत हृदयाच्या इतर भागांवर मोठा भार येतो. त्वरित निदान व उपचार झाले नाही, तर हार्टफेल होण्याचा व रुग्ण दगावण्याचा मोठा धोका असतो. सीमा म्हात्रे या रूग्णाची प्रकृती वेगाने ढासळत होती. त्यामुळे आम्ही रात्रीच त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. ही शस्त्रक्रिया 5 तासांपेक्षा जास्त काळ चालली आणि यशस्वी झाली. त्यानंतर रुग्णाला अतिदक्षता विभागात हलविण्यात आले.”
रुग्णाचा मुलगा महेंद्र म्हात्रे यांनी आपला अनुभव सांगितला, “माझ्या आईला यापूर्वी कधीच मोठे आजार झाले नव्हते. आमच्या कुटुंबात आम्ही नेहमीच वार्षिक आरोग्य तपासणीबाबत जागरूक होतो आणि आईच्या तपासणीचे निष्कर्ष सामान्य स्वरुपातील होते. तिला हृदयविकाराचा झटका येणे, ही आम्हा सर्वांसाठी आश्चर्याची बाब होती. आम्ही घाबरलो होतो. माझ्या आईला सर्वोत्तम उपचार मिळावेत, यासाठी सर्वकाही करण्याची आमची तयारी होती. सुरुवातीला तिला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर, नवी मुंबईतील ‘रिलायन्स हॉस्पिटल’मध्ये अधिक सुविधा व कुशल डॉक्टर उपलब्ध असल्याने आम्हाला येथे दाखल होण्याचा सल्ला देण्यात आला. coronavirus: अखेर कोरोनाविरोधात रामबाण उपाय सापडला, असं होणार विषाणूचं काम तमाम
‘व्हीएसआर’वर उपचार करण्यात निष्णात असलेल्या काही रुग्णालयांपैकी हे रुग्णालय आहे. त्वरीत निर्णय घेणे आम्हाला भाग होते. डॉ. कमलेश आणि त्यांच्या टीमने अत्यंत निपुणतेने आणि सौहार्दपूर्ण रितीने उपचार केले. त्यांनी आम्हाला चांगले मार्गदर्शन केले आणि आश्वासितही केले. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.” कोरोनामुळे प्रजनन क्षमतेवर होतोय गंभीर परिणाम; या उपायानं मिळणार दिलासा, संशोधनातून खुलासा
अतिदक्षता विभागात पाच दिवस ठेवण्यात आलेल्या या महिलेवर सतत देखरेख ठेवण्यात येत होती व तिची नर्सिंगची काळजी घेण्यात येत होती. 24 जानेवारी, 2021 रोजी डिस्चार्ज देताना ती स्वस्थ होती. सध्या तिची प्रकृती स्थिर आहे. तिच्याकडून उपचारांनंतरचा पाठपुरावा नियमितपणे सुरू आहे.