शेवग्याच्या शेंगाची वेगवेगळ्याप्रकारे भाजी केली जाते. खासकरुन डाळीमध्ये शेंगा आवडीने खाल्ल्या जातात. या शेंगा टेस्टी लागण्यासोबतच याने अनेक फायदेही आहेत. शेवग्याच्या शेंगांमध्ये उच्च प्रतीची मिनरल्स, प्रोटीन्स आढळतात. यामुळे त्याचा आहारात समावेश करणे हे नक्कीच आरोग्यदायी ठरते. चला जाणून घेऊया शेवग्याच्या शेंगाचे आरोग्यदायी फायदे...
1) हाडं बळकट होतात
शेवग्याच्या शेंगांमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि मुबलक व्हिटामिन्स आढळतात. यामुळे हाडांना मजबुती मिळते. त्यामुळे त्याचा रस किंवा दूधासोबत शेवग्याच्या शेंगांचा आहारात समावेश करणे हाडांच्या बळकटीसाठी फायदेशीर ठरते. म्हणूनच मुलांच्या हाडांची वाढ सुधारण्यासाठी त्यांच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करा.
2) रक्त शुद्ध होते
शेवग्याच्या पानांप्रमाणेच त्यांच्या शेंगामध्येदेखील रक्ताचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असते. त्यामुळे हे शरीरात अॅन्टीबायोटीक एजंट म्हणून काम करते. त्यामुळे रक्तातील दुषित घटक वाढल्याने होणारा अॅक्नेचा त्रास, त्वचाविकार कमी करण्यास शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात.
3) रक्तातील शुगर नियंत्रणात ठेवते
शेवग्याच्या शेंग्यांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. परिणामी मधूमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पित्ताशयाचे कार्य सुधारण्यासही शेंग़ा फायदेशीर ठरतात. त्यामुळे शरीराचे कार्य आणि स्वास्थ्यही सुधारते.
4) श्वसनविकारांना कमी करते
घशातील खवखव, कफ, श्वास घेताना त्रास होणे असा त्रास होत असल्यास शेवग्याच्या शेंगांचे कपभर सूप प्यावे.यामधील दाहशामक घटक श्वसनमार्गातील टॉक्सिक घटक कमी करण्यास मदत करतात. क्षयरोग, ब्रोन्कायटीस, अस्थमा यासारख्या फुफ्फुसांच्या आजारांमध्येही शेवग्याच्या शेंगा उत्तम नैसर्गिक उपाय म्हणून काम करतात.
5) संसर्गापासून संरक्षण होते
शेवग्याच्या पानांमध्ये, फूलांमध्ये अॅन्टीबॅक्टेरियल घटक असतात. यामुळे अनेक प्रकारच्या संसर्गापासून तुमचा बचाव होण्यास मदत होते. शेवग्याच्या शेंगांमध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे व्हिटामिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यास मदत करते. तसेच शरीरातील फ्री रॅडीकल्सचा धोका कमी करण्यासही शेवग्याच्या शेंग़ा फायदेशीर ठरतात.
6) लैंगिक आरोग्य सुधारते
शेवग्याच्या शेंगांमधील झिंक घटक स्त्रीयांप्रमाणेच पुरूषांचे लैंगिक आरोग्य सुधारण्यास फायदेशीर ठरते. यामुळे उत्तम दर्जाचे वीर्य निर्माण होते तसेच शीघ्रपतनाची समस्या कमी करण्यास शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात.