मायग्रेनचा त्रास होण्याची समस्या आज अनेकांना होत आहे. या वेदनादायी त्रासातून सुटका मिळण्यासाठी अनेकजण वेगवेगळे उपाय करतात. पण ही समस्या कशामुळे होते याकडे फारसं कुणी लक्ष देत नाही. वेळेवर यावर उपचार न केल्यास ही समस्या अधिक वाढत जाते. जनरली अर्ध डोकं दुखणे किंवा पूर्ण डोकं दुखण्यासोबत मानेच्या खालच्या भागातही वेदना होतात. पण कोणत्या चुकीच्या सवयींमुळे मायग्रेनची समस्या होते हे आज जाणून घेऊया.....
खूप जास्त तणाव
मायग्रेनची समस्या होण्याचं सर्वात मोठं कारण म्हणजे तणाव आहे. ज्या व्यक्तींना जास्त तणावाचा सामना करावा लागतो त्यांच्यांमध्ये मायग्रेन अधिक आढळतो. तणाव, डिप्रेशन आणि रागाच्या स्थितीत अत्यंत संवेदनशील असलेल्या व्यक्तींना मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. थोड्या थोड्या वेळाने मूड बदलणे हेही मायग्रेनचं लक्षण आहे. तज्ज्ञांनुसार, अनेक रुग्णांमध्ये हे आढळतं की, ते अचानक डिप्रेशनमध्ये येतात आणि थोड्या वेळाने काहीही कारण नसताना नॉर्मल होतात.
घट्ट कपडे
फार घट्ट किंवा टाईट कपडे परिधान केल्याने पोटावर प्रेशर येतं, ज्यामुळेही डोकेदुखी होते. जास्तवेळ पोट आत दाबून ठेवल्यानेही कधी कधी पोट फुटेल की काय असं वाटतं. त्यामुळे या त्रासापासून वाचायचे असेल तर जास्त टाइट कपडे परिधान करु नका किंवा जेवताना पोट टाइट ठेवू नका.
वेळेवर जेवण न करणे
जर तुम्ही वेळेवर योग्य प्रमाणात जेवण न केल्यास आणि खूपवेळ उपाशी राहिल्यानेही मायग्रेनचा झटका येऊ शकतो. त्यासोबत जास्त प्रमाणात मद्यसेवन, वातावरणातील बदल, आहारातील बदल आणि कमी झोप घेणे यामुळेही ही समस्या जाणवते.
कमी पाणी पिणे
पाणी हे आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे काही वेगळं सांगायला नको. पाण्यात आपलं शरीर निरोगी ठेवण्यासाठीचे अनेक उपयुक्त तत्व असतात. पण अनेकदा काही लोक आवश्यक तितकं पाणी पित नाहीत. त्यामुळे ही समस्या निर्माण होते.
व्हिटॅमिन्सची कमतरता
व्हिटॅमिन्सच्या कमतरतेमुळे लहान मुलांमध्ये, तरुणांमध्ये आणि वयोवृद्धांमध्ये मायग्रेनची समस्या होऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला मायग्रेनची लक्षणे दिसली तर व्हिटॅमिन्सची तपासणी करा. मायग्रेनने ग्रस्त असलेल्या जास्तीत जास्त रुग्णांमध्ये व्हिटॅमिन डी, रायबोफ्लेबिन आणि कोइंजाम क्यू-१० या व्हिटॅमिन्सची कमतरता आढळते.
जास्त प्रमाणात चहाचं सेवन
अनेकदा चहाच्या अधिक सेवनामुळेही डोकेदुखीचा त्रास होतो. चहा आणि कॉफीमध्ये असलेल्या कॅफिनमुळे ही समस्या होते. पुडिंग किंवा केकमध्येही कफिनचा वापर होतो. त्यामुळेही डोकेदुखी होते.