Long Life Tips : तुम्ही पाहिलं असेल की, जुन्या काळातील लोक म्हणजे तुमचे आजी-आजोबा शंभर किंवा त्यापेक्षा जास्त काळ जगायचे. त्यांची लाइफस्टाईल, खाण्या-पिण्याच्या सवयी खूप वेगळ्या होत्या. शारीरिक मेहनतही खूप करायचे. पण आजकाल चुकीची लाइफस्टाईल, चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि कमी शारीरिक हालचाल किंवा मेहनत यामुळे लोक लठ्ठपणा, डायबिटीस, हृदयरोग, कॅन्सर अशा अनेक गंभीर आजारांचे शिकार होत आहेत. ज्यामुळे कमी वयातच त्यांचा मृत्यू होतोय. म्हणजे काय तर लोकांचं आयुष्य किंवा जगण्याचा कालावधी कमी झालाय.
मात्र, अजूनही वेळ गेलेली नाहीये काही गोष्टी फॉलो करून तुम्ही तुमचं आयुष्य वाढवू शकता. हा दावा आमचा नाही तर अमेरिकन सोसायटीच्या न्यूट्रिशनिस्ट २०२३ च्या इव्हेंटमध्ये सादर करण्यात आलेल्या रिसर्चमधून करण्यात आला आहे. अमेरिकन सोसायटी फॉर न्यूट्रिशनिस्टने सैन्यातील ७ लाख २० हजार सैनिकांचा ज्यांचं वय ४० ते ९९ दरम्यान आहे त्यांच्या लाइफस्टाईलचा अभ्यास केला आणि यातून त्यांनी आयुष्य वाढवण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत.
नियमित एक्सरसाइज
वेगवेगळ्या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, नियमित एक्सरसाइज केल्याने तुमचं आयुष्य वाढू शकतं. एक्सरसाइजमुळे शरीराचं आयुष्य वाढतं, वेगवेगळ्या आजारांचा जसे की, हृदयरोग, डायबिटीसचा धोका कमी होतो. रोज पायी चालणे, धावणे, स्वीमिंग करणे, वेगवेगळे खेळ खेळणे याने पूर्ण शरीर फीट राहतं. त्यामुळे नियमित एक्सरसाइज करा.
चांगली झोप
झोप ही आपल्या शरीरासाठी फार महत्वाची असते. शरीर हे एका इंजिनासारखं असतं त्यालाही रिपेअरींगची गरज असते. झोपेत आपलं शरीर रिपेअर होत असतं. झोपेत शरीरातील डॅमेज पेशी रिपेअर होतात आणि इम्यून सिस्टीम मजबूत होतं. चांगल्या झोपेने तुमचा हृदयरोग, डायबिटीस आणि लठ्ठपणाचा धोका कमी होतो. तसेच चिंता दूर होऊन मानसिक शांतता मिळते.
मद्यसेवन
आजकाल बरेच लोक खूप जास्त मद्यसेवन करू लागले आहेत. ज्यामुळे शरीराचं तर नुकसान होतंच आहे सोबतच त्यांचं मानसिक आरोग्यही बिघडत आहे. रोज मद्यसेवन केल्याने इम्यूनिटी कमजोर होते आणि वेगवेगळे आजार होतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीरात महत्वाचे अवयव लिव्हर आणि किडन्याही फेल होतात. अर्थातच याने तुमचं आयुष्य कमी होतं. मद्यसेवनाने शरीराचं कामकाज बिघडतं आणि हृदयावर दबाव वाढतो. अशात मद्यसेवन बंद केलं तर या समस्या होणार नाहीत आणि तुमचं आयुष्या वाढेल.
पौष्टिक आहार
२०१८ च्या एका रिसर्चनुसार, संतुलित आणि पौष्टिक आहार तुमचं आयुष्य वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावतं. पौष्टिक आहारामुळे हृदय आणि मेंदुचं आरोग्य चांगलं राहतं. असं म्हटलं जातं की, सकाळचा नाश्ता हा राजासारखा करावा, राजकुमारासारखं दुपारचं जेवण करावं आणि रात्री गरीबासारखं म्हणजे कमी किंवा हलकं जेवण करावं. बाहेरचे फास्ट फूड, जंक फूड खाणं बंद करा. पौष्टिक आहाराची सवय नक्कीच तुमचं आयुष्य वाढवू शकते.
स्मोकिंग
स्मोकिंग करणाऱ्या लोकांचं आयुष्य १० वर्षाने कमी होतं. स्मोकिंगमुळे आपल्या शरीरातील महत्वाचा अवयव म्हणजे फुप्फुसं खराब होतात. जास्त काळ स्मोकिंग केल्याने फुप्फुसांचा कॅन्सरही होतो. स्मोकिंगमुळे हृदयाचं नुकसान होतं, शरीरातील नसा डॅमेज होतात. ज्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका वाढतो. स्मोकिंग बंद केलं तर शरीर निरोगी होईल आणि तुमचं आयुष्य वाढू शकतं.
स्ट्रेस कमी घ्या
आजकाल लोक वेगवेगळ्या कारणांनी खूप स्ट्रेसमध्ये असतात. स्ट्रेस हार्मोन्स कोर्टीसोलमुळे ब्लड प्रेशर वाढतं. जास्त चिंता केल्याने तुम्हाला हृदयरोग, स्ट्रोक आणि डायबिटीसचा धोका वाढतो. अशात तुम्ही चिंता कमी करण्यासाठी उपाय केले पाहिजे. मेडिटेशन करून किंवा आवडीच्या गोष्टी करून तुम्ही चिंता कमी करू शकता. असं केल्याने तुमचं एकंदर आरोग्य चांगलं राहतं आणि अर्थातच आयुष्य वाढतं.
हेल्दी सोशल मीडिया कनेक्शन
सोशल मीडियाचा अतिवापर आजकाल खूप वाढला आहे. सोशल मीडियावरील गोष्टींमुळे आजकाल आनंदाऐवजी स्ट्रेस जास्त वाढत आहे. सोशल मीडियाचं व्यसन तुमचं मानसिक आरोग्य बिघडवत आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्याऐवजी मित्रांशी बोला. याने तुम्हा मानसिक आराम मिळेल. तुमची चिंता दूर होईल आणि तुम्ही हेल्दी रहाल.