अल्झायमर (Alzheimer's Disease) हा आजार विसरण्याशी संबंधित आहे. या आजाराच्या लक्षणांमध्ये स्मरणशक्ती कमी होणे, निर्णय न घेऊ शकणे, बोलण्यात अडचण येणे किंवा यामुळे सामाजिक आणि कौटुंबिक समस्या निर्माण होणे ही आहेत. रक्तदाब, मधुमेह, आधुनिक जीवनशैली आणि डोक्यावर जखम झाल्याने हा आजार होण्याची शक्यता वाढते. या आजारावर अजून काहीही ठोस उपाय नसून सुरुवातीच्या काळात नियमीत तपासणी आणि उपचाराने यावर नियंत्रण मिळवलं जाऊ शकतं. आम्ही तुम्हाला ७ असे संकेत सांगणार आहोत ज्या अल्झायमर झाल्याकडे इशारा करतात.
१) स्मरणशक्ती कमी होणे
नाव विसरणे, वस्तू हरवणे, ठरवलेल्या गोष्टी विसरणे, शब्द लक्षात न ठेवू शकणे, गोष्टी शिकण्यात आणि त्या लक्षात ठेवण्यात अडचणी निर्माण होणे या सामान्य बाबी असतात. या आजाराने तुमची पूर्ण स्मरणशक्ती पुसली जाऊ शकते. त्यासोबतच तुम्ही कुणालाही ओळखू शकणार नाहीत.
२) कोणत्याही गोष्टीचा निर्णय न घेऊ शकणे
हा आजार झाला असेल तर तुमची निर्णय क्षमता कमी होते. पर्यायांमधून तुम्ही निर्णय घेऊ शकत नाहीत. निर्णय घेताना अनेक अडचणी तुम्हाला येऊ शकतात.
३) शारीरिक ताळमेळ बसवण्यात समस्या
शरीरावर नियंत्रण न राहिल्याने तुम्ही पडूही शकता किंवा जेवण तयार करणे, ड्रायव्हिंग करणे, घरातील इतर कामे करतांना तुम्हाला अनेक अडचणी येऊ शकतात. आजार जास्तच वाढला असेल तर तुम्ही रोजची कामे जसे की, आंघोळ करणे, कपडे परिधान करणे, तयार होणे, जेवण करणे, टॉयलेटला जाणे यांसारखी कामे कुणाच्याही मदतीशिवाय करु शकणार नाहीत.
४) अंकांची ओळख न होऊ शकणे
या आजारामुळे तुम्हाला अक्षरांची किंवा अंकांची ओळख करण्यास त्रास होऊ शकतो आणि हिशोब करण्यासही समस्या येऊ शकते.
५) वेळ, तारीख आणि ठिकाण विसरणे
या आजाराने ग्रस्त असाल तर तुम्हाला वेळ, तारीख आणि दिवस तसेच ओळखीची ठिकाणेही लक्षात राहत नाहीत. तुम्ही तुमच्या घराचा पत्ताही विसरु शकता. तुम्ही काय काम करता हेही विसरु शकता.
६) बोलण्यात अडचण
हा आजार तुम्हाला झाला असेल तर तुम्ही एकही भाषा नीट बोलू शकणार नाहीत. तसेच तुम्हाला वाटतं ते शब्दात व्यक्त न करता येणे किंवा लिखित अक्षरे समजण्यासही अडचण होऊ शकते.
७) व्यक्तीमत्वात बदल
तुम्ही विनाकारण आक्रामक होऊ शकता किंवा चिंतेत राहू शकता. हा आजार झाल्यावर तुम्ही तसे सामान्य व्यक्तीच असता पण तुमच्या व्यक्तिमत्वात अचानक बदल होतो. आणि जसेही तुम्ही यातून बाहेर येता तेव्हा पुन्हा शांत व्यक्ती होता.