मुंबई : उन्हाळा सुरु झाला की, दिवसेंदिवस वाढणा-या तापमानामुळे आणि उन्हाच्या झळांनी जगणं कठिण होऊन जातं. बाहेर गेलं तरी गरम आणि घरात आलं तरी गरम. अशात गरमी दूर करण्यासाठी अनेकजण एसीचा वापर मोठ्या प्रमाणात करतात. पण एसीचे सुद्धा अनेक दुष्पपरिणाम होतात. अशावेळी उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी तुम्ही काही खास आणि सोपे उपाय करु शकता. अशाच काही घर थंड ठेवण्याच्या टीप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
1) आईस फॅन
ही एक झक्कास आयडिया वापरून तुम्ही घर थंड ठेवू शकता. महत्वाची गोष्ट म्हणजे यासाठी तुम्हाला फार काही करण्याचीही गरज नाही. यासाठी तुम्हाला एक टेबल फॅन, एक स्टीलचं भांडं आणि बर्फ इतक्याच वस्तू हव्यात. त्या भांड्यात बर्फ ठेवून ते भांडं फॅनसमोर ठेवा आणि थंड वा-याने गरमी पळवा. स्टीलचं भांडं हे छिद्र असलेलं असेल तर आणखीन चांगलं होईल. कारण बर्फाचं झालेलं पाणीही नंतर थंडावा देत राहतं.
2) घर जरा मोकळं करा
तुमच्या घरात जेवढ्या जास्त वस्तू असतील तेवढी जास्त गरमी तुम्हाला होईल. अशावेळी घरातील काही जास्तीच्या वस्तू तुम्ही काही दिवसांसाठी बांधून ठेवू शकता. नायलॉनची चटई, जाड गालिचे, वुलनचे कारपेट अशा वस्तू दूर करा. असे केल्याने घर रिकामंही होईल आणि घरात हवा खेळती राहिल.
3) घरात झाडे ठेवा
(Image Credit : YouTube)
उन्हाळ्यात घर थंड ठेवण्यासाठी हाही एक चांगला पर्याय आहे. तुमच्या घराच्या बाल्कनीतील वेगवेगळ्या झाडांच्या कुंड्या, वेगवेगळे प्लांट घरात ठेवा. यानेही घरात थंड हवा राहते.
4) शेड नेट
(Image Credit : nubenny.blogspot.in)
घर थंड ठेवण्यासाठी किंवा उन्हात थंडावा मिळवण्यासाठी घराच्या बाल्कीनीत किंवा खिडक्यांना शेड नेट लावल्यास फायदा होतो. ही शेड नेट बाजारात सहज उपलब्ध होते.
5) पांढरा रंग
इतर गर्द रंगांचं घराचं छत अधिक गरम असतं. अशात घर थंड ठेवण्यासाठी घराच्या छताला पांढरा रंग दिल्यास चांगला फायदा होतो. पांढरा रंग किंवा पीओपीमुळे घर थंड राहतं. कारण पांढरा रंग हा रिफ्लेक्टरचं काम करतो.
6) सकाळी आणि सायंकाळी तापमान कमी होतं. त्यामुळे या दोन्ही वेळात घराची दारं आणि खिडक्या उघड्या ठेवा.
7) उन्हाळ्यात घरात हलक्या रंगांचे पडदे आणि बेड-शीटचा वापर करा. खासकरुन कॉटनच्या बेडशीट्स आणि पिलो कव्हर वापरा.