भारतीय मसाल्यांमध्ये लवंगाचा वापर खाद्यपदार्थांचा आस्वाद वाढवण्यासाठी केला जातो. जेवणाची चव वाढवण्याशिवाय लवंगाचे आरोग्यदायी फायदेदेखील आहेत. औषधी गुणांमुळे कित्येक आजारांवर लवंग ही बहुगुणकारी आहे. दातांचे दुखणे, तोंडाची दुर्गंधी, घसा खवखवणे यांसारख्या आजारावर लवंग बहुगुणकारी आहे. लवंगमध्ये प्रोटीन, लोह, कार्बोहायड्रेट्स, कॅल्शिअम आणि सोडियम अॅसिडचे भरपूर प्रमाण आहे. आजारांना समूळनष्ट करण्याचे काम लवंग करते. जाणून घेऊया लवंगीचे औषधी गुण
1. गॅसच्या समस्येपासून मुक्तता :धकाधकीचे आयुष्य, जंक फूड आणि रस्त्यावरील उघड्या पदार्थांच्या सेवनामुळे गॅसेसच्या समस्या उद्भवतात. यामुळे पोटदुखीचा त्रास होता. या त्रासातून तात्काळ सुटका व्हावी, यासाठी आरोग्यास अपायकारक ठरतील अशा औषधांचे सेवन केले जाते. हानिकारक औषधांऐवजी घरगुती उपायांचा अवलंब करावा. गॅसेसच्या समस्येवर लवंग गुणकारी औषध आहे. गॅस आणि बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळवण्यासाठी सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास गरम पाण्यात लवंग तेलाचे काही थेंब मिसळून प्यावे. याने पोटाला आराम मिळतो.
2.सर्दी खोकल्याचा त्रास होतो कमी : बदलत्या हवामानानुसार अनेकांना सर्दी-खोकल्याचा त्रास होत असतो. या त्रासातून लवंग नक्कीच तुमची सुटका करेल. सर्दी-खोकला किंवा घशामध्ये खवखव होऊ लागल्यास तोंडामध्ये एक लवंग ठेवावी. यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास कमी होईल.
3. तोंडाची दुर्गंधी : पायरिया आजारानं ग्रस्त असणाऱ्या व्यक्ती बराच वेळ उपाशी पोटी राहिल्यास त्यांच्या तोंडाला दुर्गंध येऊ शकते. दुर्गंधीची ही समस्या दूर करण्यासाठी 40 ते 45 दिवस सलग रोज सकाळी अख्ख्या लवंगीचे सेवन करावे.
4. चेहऱ्यावरील डागांची समस्या :लवंग आपले सौंदर्याला आणखी तेजस्वी करण्याचेही काम करते. चेहऱ्यावर मुरुमांचे डाग, डार्क सर्कल अशा समस्या असल्यास लवंगाचा वापर करावा. लवंगाची पावडर आणि बेसनचा पॅक चेहऱ्यावर लावावा. पण हा फेसपॅक अप्लाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कारण लवंग गरम असते यामुळे जळजळ होण्याची शक्यता असते.
5. केसगळती रोखण्यास मदत :बहुतांश जण केसगळती आणि केसांच्या रुक्षपणामुळे हैराण असतात. ही समस्या लवंगामुळे कमी होऊ शकते. यासाठी पाण्यामध्ये लवंग उकळावी आणि त्या पाण्यानं केस धुवावेत. यानंतर तुम्हाला चमकदार आणि मजबूत केस पाहायला मिळतील.