(Image Credit : Deccan Herald)
तसे तर कोणतेही आई-वडील नेहमीच आपल्या मुला-मुलींची काळजी घेत असतात. पण अशीही एक वेळ असते जेव्हा मुला-मुलींची एक्स्ट्रा काळजी पालकांना घ्यावी लागते. त्यांच्या मागे दुधाचा ग्लास आणि हेल्दी फूड घेऊन पळावं लागेल आणि मुलं-मली आता जास्तीत जास्त वेळ अभ्यास करताना दिसतील कारण सध्या वेगवेगळ्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षा काळात मुला-मुलींच्या मेंदूवर फार दबाव असतो, ते सगळंकाही एकटे मॅनेज करू शकत नाहीत. अशात पालकांनी त्यांना मदत करणे गरजेचे आहे. अशाच मुला-मुलींचं टेन्शन दूर करणाऱ्या काही टिप्स आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
डोकं शांत ठेवा
तुमचं डोकं जितकं जास्त शांत असेल तितका तुम्ही अधिक स्पष्टपणे विचार करू शकाल की, तुम्ही तुमच्या मुलांना स्ट्रेस फ्री कसं ठेवायचं. जर तुम्ही स्वत: पॅनिक झालात तर मुला-मुलींवर अधिक जास्त दबाव येईल. त्यामुळे आधी तुम्ही शांत रहा आणि घाबरू नका. याने मुलं शांत होऊन अभ्यास करू शकतील.
इतरांशी तुलना करू नका
पालकांची सर्वात मोठी चुक असते की, ते आपल्या मुला-मुलींची तुलना दुसऱ्या मुला-मुलींसोबत करतात किंवा स्कोरबाबत दुसऱ्या मुलांचं कौतुक करतात. आणि आपल्या पाल्यांना ओरडतात. असं केल्याने मुला-मुलींचा आत्मविश्वास कमी होतो. त्यामुळे तुमच्या पाल्यांची तुलना इतरांशी करणे बंद करा. त्याऐवजी त्यांना प्रोत्साहन द्या आणि नेहमी त्यांच्या बाजूने उभे रहा.
दुर्लक्ष होऊ देऊ नका
मुला-मुलींना अभ्यासावर फोकस करण्यासाठी लेक्चर देत बसण्यापेक्षा त्यांच्यासोबत बसा आणि त्यांना मदत करा. त्यांना समजवा की, तुम्ही जर अभ्यासावर लक्ष केंद्रीत केलं तर चांगले मार्स्क मिळवू शकाल. तसेच त्यांच्यापासून स्मार्टफोन, टीव्ही, सोशल मीडियाही दूर ठेवा.
सोबत रहा पण डोक्यावर बसू नका
पालक म्हणून तुम्ही तुमच्या मुला-मुलींसाठी सर्वात चांगले सपोर्ट सिस्टम असता. जर तुम्ही त्यांच्या आजूबाजूला रहाल तर त्यांना रिलॅक्स वाटेल आणि ते चांगला अभ्यास करू शकतील. सोबतच त्यांना अभ्यासात काही कन्फ्यूजन झालं तर ते तुम्हाला विचारूही शकतील. पण सतत त्यांच्या डोक्यावर बसून राहू नका. याने त्यांची चिडचिड वाढेल.
एक रूटीन तयार करा
कोणत्याही कामासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ती रूटीन. तुम्हीही तुमच्या पाल्यासाठी एक टाईमटेबस तयार करून द्या. त्यांच्या रूटीनमध्ये हेल्दी ब्रेकफास्टसोबतच खाण्यासाठी हेल्दी पदार्थांचाही समावेश करा. याने त्यांचं आरोग्यही चांगलं राहील आणि ते योग्य प्रकारे अभ्यासही करू शकतील.
ब्रेक सुद्धा गरजेचा
अभ्यासादरम्यान ब्रेक घेणे सुद्धा गरजेचा असतो, याने त्यांच्या मेंदूला आराम मिळतो आणि त्यांना फ्रेश वाटतं. तसेच असं केल्याने अभ्यासावरही चांगलं लक्ष केंद्रीत होतं. ब्रेकमध्ये मुलं-मुली जॉगिंग करण्यासोबतच, गाणी ऐकणे आणि सायकलींगही करू शकतात. याने त्यांना चांगलंच फ्रेश वाटेल. त्यामुळे ब्रेकसाठी त्यांना प्रोत्साहित करा.
सकारात्मक वातावरण
सर्वच पालकांना असं वाटत असतं की, त्यांच्या मुला-मुलींनी परीक्षेमध्ये चांगले मार्क्स मिळवून पास व्हावे. पण याचा अर्थ हा नाही की, यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जावा. त्यासाठी घरात सकारात्मक वातावरण तयार करा, जेणेकरून ते मोकळ्या वातावरणात अभ्यास करू शकतील.