एका नवीन रिसर्चमधून, भारतातील 71 टक्के लोकांच्या मांसपेशी कमजोर असल्याचे स्पष्ट झाले आहे. वर्ष 2017मध्ये इंडियन मार्केट रिसर्च ब्युरो (IMRB)ने केलेल्या एका संशोधनातून असं देखील सांगण्यात आलं आहे की, जवळपास 84 टक्के शाकाहारी आणि 65 टक्के मांसाहारी लोकांच्या आहारामध्ये प्रोटीनची फार कमतरता आढळून आली. या नव्या संशोधनातून असं सिद्ध झालं की, आपल्या दररोजच्या आहारातून लोकांना मुबलक प्रमाणात प्रोटीन मिळत नाही. ज्यामुळे लोकांच्या मांसपेशी कमजोर होत आहेत.
प्रोटीन सप्लीमेंट घेण्याची गरज
दिवसेंदिवस शरीरातील मांसपेशी कमजोर होत गेल्याने एखादी वेळ अशीही येऊ शकते की, तुम्ही एनर्जेटिक राहू शकणार नाही. ज्यामुळे कोणतंही काम करणं तुमच्यासाठी फार अवघड ठरू शकतं. हेल्थ एक्सपर्टनुसार, अशावेळी हायड्रोलाइज्डयुक्त प्रोटीन सप्लीमेंट शरीरामध्ये प्रोटीनची कमतरता दूर करण्यासाठी मदत करतील. परंतु हे सप्लीमेंट्स घेताना तज्ज्ञांच्या सल्याने घेणं गरजेचं ठरतं.
शरीरासाठी आवश्यक आहेत प्रोटीन
अनेक लोकांचा असा समज असतो की, प्रोटीनची गरज फक्त बॉडी बिल्डर्सनाच असते. परंतु या रिसर्चनंतर हे सिद्ध झालं आहे की, प्रोटीन प्रत्येक व्यक्तीला आवश्यक असतं. संशोधकांनी सांगितले की, अनेक लोकांना याबाबत माहिती नसते की, त्यांच्या शरीराला किती प्रोटीन्सची आवश्यकता असते. तसेच त्यांना हेदेखील माहीत नसते की, शरीरातील प्रोटीन्सच्या कमतरतेमुळे कोणत्या परिणामांचा सामना करावा लागतो. लोकांना आपल्या डाएटमध्ये 10 ते 14 ग्रॅम प्रोटीन्सची पातळी वाढविण्याची गरज असते.
व्यायाम करा
उत्तम आरोग्यासाठी अनेकदा डॉक्टरही व्यायाम करण्याचा सल्ला देत असतात. दररोज व्यायाम केल्याने शरीराच्या अनेक समस्या दूर होतात. पण आपल्यापैकी अनेकजण व्यायाम करण्याचा कंटाळा करतात. त्यामागे अनेक कारणंही असतात. परंतु मांसपेशी मजबुत होण्यासाठी व्यायाम करणं अत्यंत आवश्यक असतं. आहाराच्या जोडीला व्यायामाची साथ मिळाली तर मांसपेशी बळकट होण्यासाठी मदत होते. प्रोटीनयुक्त डाएट घेण्यासोबतच क्रंचेज, पुशअप्स, रनिंग, स्ट्रेचिंग यांसारख्या एक्सरसाइज करण्यात येतात. त्यामुळे मसल्स स्ट्रॉन्ग बनवण्यासाठी दररोज व्यायाम करणं गरजेचं असतं.
दूध, डाळ आणि मासे यांचा आहारात समावेश
मसल्स योग्य प्रकारे मजबुत करण्यासाठी प्रोटीन्सची सर्वात जास्त गरज असते. परंतु प्रोटीन्ससोबतच शरीरासाठी मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि कार्बोहायड्रेट्सही आवश्यक असतात. यामुळे जेवणामध्ये दूध, डाळ आणि माशांचा आहारात समावेश केल्यामुळे शरीरातील प्रोटीन्सची कमतरता दूर करण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर केक, बिस्किट्स यांसारख्या पदार्थांपासून दूर रहा. आपल्या डाएटमध्ये गहू, हिरव्या पालेभाज्या आणि फळांचाही समावेश करा.