पॉवर नॅप किती महत्त्वाची आहे आणि त्यामुळे तुमचा मूड, सतर्कता, उत्पादकता, अल्पकालीन स्मृती.. इत्यादी अनेक गोष्टी कशा सुधारतात, विशेषत: काही ठराविक प्रसंगी कमी झोपेवर पॉवर नॅपमुळे कशी प्रभावी मात करता येते, याची माहिती आपण गेल्या लेखात पाहिली. अटीतटीच्या आणि आणीबाणीच्या प्रसंगी या पॉवर नॅपचा फारच उपयोग होतो.
अनेकांना दुपारी झोपायची, वामकुक्षी, डुलकी घेण्याची सवय असते. पण या काळात ते तासन्तास चक्क झोपा काढतात. मात्र, तज्ज्ञांचं म्हणणं आहे, ज्यांना गरज आहे त्यांनीच दुपारच्या वेळी फक्त दहा मिनिटांची एखादी छोटी डुलकी घ्यावी. दिवसभरातील आपली सतर्कता आणि उत्पादकता वाढवण्यासाठी ही दहा मिनिटांची डुलकी त्यांना नवी संजीवनी देऊन जाईल. अनेक तज्ज्ञ सांगतात, दुपारची वामकुक्षी १५ ते ३० मिनिटांपेक्षा जास्त नसावी. त्यापेक्षा जास्त काळ तुम्ही झोपला, तर मग अतिशय गाढ अशा झोपेकडे तुमचा प्रवास होतो आणि त्या झोपेतून उठणं, पुन्हा कामाला लागणं, विशेषत: उत्साहानं काम करणं अवघड होऊन जातं.
‘टार्गेट’च्या बोजामुळे अनेकांना काही वेळा रात्रीही पुरेशी झोप मिळत नाही आणि दिवसा तर डुलकीसाठी दहा-पंधरा मिनिटेही काढणं त्यांच्यासाठी अशक्य असतं. पण जर त्यांना आपल्या बिझी शेड्यूलमधून केवळ पाच मिनिटे जरी काढता आली आणि त्या काळात ते नुसते डोळे मिटून बसले, तरीही त्यांना त्याचा बराच फायदा होऊ शकतो. एकदम फ्रेश वाटू शकतं आणि तरतरी येऊ शकते. ही पाच मिनिटं, दहा मिनिटं.. अतिशय महत्त्वाची. ती तुम्हाला खरोखर ‘पॉवर’ देऊन जातात. पण ज्यांना खरोखरच झोप मिळालेली नाही किंवा काही करणानं ज्यांना झोप घेता येत नाहीए त्यांच्यासाठीच पॉवर नॅप गरजेची. इतरांना किंवा ज्यांना पुरेशी झोप मिळालेली आहे, त्यांना या पॉवर नॅपची गरज नाही. या काळात डुलकी घेण्याऐवजी पाच-दहा मिनिटे ते जलद चालले, एक मिनीट स्क्वॉट्स (बैठका) मारल्या, पुशअप्स काढले तरी त्यांना त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतात. पॉवर नॅप नेमकी कशी घ्यायची, हे पाहूया पुढच्या भागात..