लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: वैद्यकीय विश्वात दिवसागणिक होणाऱ्या प्रगतीमुळे परळ येथील एक खासगी रुग्णालयात ६४ वर्षांच्या वृद्ध महिलेवर क्लिष्ट आणि गुंतागुंतीची फुफ्फुस प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पडली. त्या महिलेला फुफ्फुसाचा असाध्य आजार झाल्याने त्यांना फुफ्फुस प्रत्यारोपणाशिवाय पर्याय नव्हता. अखेर डॉक्टरांनी मेंदूमृत व्यक्तीकडून मिळालेल्या फुफ्फुसाचा वापर करून या महिलेला जीवनदान दिले. दरम्यान, घरकाम करणारी ही महिला अनेक वर्ष नियमितपणे कबुतराची विष्ठा आणि पिसांनी भरलेली गच्ची आणि खिडक्या साफ करण्याचे काम करत होती. त्यामुळे या महिलेला फुफ्फुसाचा त्रास झाला असल्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे.
दक्षिण मुंबईत परिसरात घरकाम करणाऱ्या या रुग्ण महिलेला २०१६ मध्ये फुफ्फुसाचा आजार असल्याचे निदान करण्यात आले होते. ही महिला अनेक वर्ष कबुतरांची विष्ठा आणि पिसांनी भरलेली गच्ची यावरील साफसफाईचे काम करत होती. त्याचा परिणाम तिच्या फुफ्फुसांवर झाला.कबुतरांची विष्ठा आणि पिसे या दोन्ही गोष्टी फुफ्फसांना खराब करतात. २०१९ मध्ये त्या महिलेची तब्बेत खालावली त्यावेळी त्या नियमितपणे घरीच कृत्रिम प्राणवायु घेत होत्या. मात्र २०२२ मध्ये जेव्हा हा आजार बळावला त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना फुफ्फुसाचा फायब्रोसिस - या स्थितीत फुफ्फुस खूपच कमकुवत होऊन रुग्णाला स्वतःहून श्वास घेणे खूप जिकिरीचे होते. त्यावेळी फुफ्फुस प्रत्यारोपण हाच पर्याय असतो.
मुंबई विभागीय प्रत्यारोपण समन्वय समितीच्या प्रतीक्षा यादीवर असणाऱ्या या रुग्णाला ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात मेंदूमृत व्यक्तीद्वारे यांना फुफ्फुस हा अवयव मिळाला आहे.त्यानंतर त्यांच्यावर फुफ्फुस प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया करण्यात आली.
याप्रकरणी, ग्लोबल रुग्णालयाचे फुफ्फुस प्रत्यारोपण शल्यचिकित्सक डॉ चंद्रशेखर यांनी सांगितले, " अंतिम टप्प्यातील फुफ्फुसांच्या आजारांवर उपचार पर्यायाबाबत जागरूकता अजूनही कमी आहे आणि लोकांना फुफ्फुस प्रत्यारोपणाच्या फायद्यांविषयी माहिती नाही. फुफ्फुस हे एकमेव अवयव आहेत जे थेट बाहेरील वातावरणाच्या संपर्कात येतात. शस्त्रक्रिया चांगली झाली असून त्यांना काही काळ अजून वैद्यकीय देखरेखीखाली ठेवून औषध उपचार केले जाणार आहे.