लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई - गेल्या सहा महिन्यांपासून पोटदुखीच्या त्रासाने हैराण असलेल्या महिलेच्या गर्भाशयातून पाच किलोची मोठी गाठ काढली आहे. पालिकेच्या व्ही.एन. देसाई रुग्णालयात पार पडलेली ही शस्त्रक्रिया तब्बल सहा तास सुरु होती. आता या महिला रुग्णाची प्रकृती स्थिर असून सहा महिन्यांपासून होणाऱ्या पोटदुखीच्या त्रासापासून सुटका मिळाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
शस्त्रक्रियेनंतर ही महिला आता तिची सर्व दैनंदिन कामे करत आहे. या महिलेला आधी कोणतीही कामे करणे शक्य नव्हते. वरिष्ठ सल्लागार व प्रसूती, स्त्रीरोग तज्ञ डॉ. कोमल चव्हाण यांनी सांगितले , ४२ वर्षीय महिलेला पोटदुखीच्या तक्रारीवरून पालिकेच्या व्हीएन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. महिलेला रुग्णालयात आणले तेव्हा तिला ओटीपोटात वेदना, सूज आणि जडपणा जाणवत होता. स्त्रीची मासिक पाळी सामान्य होती, तपासणीत पोटात गाठ आढळून आली. वाढत्या वेदनांमुळे त्यांची दैनंदिन कामे कमी होऊ लागली. महिलेची ढासळलेली तब्येत पाहून तिच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियेनंतर महिलेच्या पोटातून पाच किलोचा गोळा काढण्यात आला. शस्त्रक्रिया शक्य तितक्या लहान चीरासह केली गेली. शस्त्रक्रियेनंतर आठवड्याभरात महिलेला घरी सोडण्यात आले.
ब्रॉड लिगामेंट फायब्रॉइड्स एक टक्क्यांपेक्षा कमी आढळतात. गर्भाशयातील ट्यूमरबाबत महिलांमध्ये जागरुकतेचा अभाव असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे, महिलांमध्ये आरोग्याबाबत जनजागृती होणे गरजेचे आहे. प्रत्येक स्त्रीने वयाच्या ३० वर्षांनंतर नियमित आरोग्य तपासणी केली पाहिजे. शस्त्रक्रियेच्या चमूमध्ये डॉ. हीना राठोड, डॉ. प्रिया सोंटके, डॉ. सचिन साळुंखे, डॉ. रीना अवखिरे, भूलतज्ज्ञ डॉ. गद्रे आणि स्टाफ नर्स दर्शन कोळी यांचा समावेश आहे.
तर गुंतागुंत वाढते
फायब्रॉइड्सच्या गाठी खूप वाढल्यास कधी आत रक्तसाव होऊन जीव धोक्यात येऊ शकतो. गाठींचा दाब मुत्राशय किंवा मूत्रवाहिनीवर पडू शकतो. पण याचा अर्थ एखाद दुसरी लहानशी गाठ असेल तरीही घाबरून घाईघाईने शस्त्रक्रिया करावी असा होत नाही. अनेक स्त्रियांमध्ये फायब्रॉइड््स असतात आणि त्यांच्यामुळे काहीच त्रास होत नसेल तर शस्त्रक्रिया करण्याची गरज नसते. मात्र त्यावर लक्ष ठेवून त्या वाढत नाहीत हे पाहावे. अनेक स्त्रियांमध्ये या गाठी वाढत नाहीत उलट रजोनिवृत्तीनंतर त्या आक्रसून जातात. हल्ली सहज सोनोग्राफी केली किंवा दुसऱ्या व्याधीसाठी पोटाची सोनोग्राफी केल्यास गर्भाशयात छोट्या गाठी आढळतात. मात्र अशा रिपोर्टमुळे घाबरून जाऊ नये. शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय पूर्ण विचारांती घ्यावा. दुसऱ्या बाजूला खूप त्रास होऊनही आणि पोटाला गाठी लागत असूनही भिती, संकोच आणि निष्काळजीपणामुळे दुखणे अंगावर काढू नये. गाठी खूप वाढल्यास शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होते , अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.