>> डॉ. नंदकिशोर कपाडिया
आताच्या घडीला माणसाचे जीवन अधिकच वेगवान होत चालले आहे. या धकाधकीच्या जीवनात माणसाला स्वतःसाठी थोडाही वेळ नाही. मागील काही वर्षांत बदललेली जीवनशैली, कोरोनानंतरची मनोवस्था आणि घडाळाच्या काट्यावरील दिनक्रमाचा परिणाम स्वास्थ्यावर होताना दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये युवकांमध्ये हृदयरोगाचे प्रमाण मोठे असल्याचे पाहायला मिळत आहे.
युवकांमध्ये विशेष करून विशी ते चाळीशीदरम्यान तुमच्या हृदयाची नीट काळजी घेणे निरोगी भविष्याच्या पायाभरणीसाठी खूप उपयुक्त ठरते. तरुण वयात हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी करण्यासाठी या काही आरोग्यदायी टिप्सचे पालन अवश्य करावे, असे सांगितले जात आहे. नेमके काय करावे, जाणून घेऊया...
रक्तदाब कमी करा
रक्तदाब सर्वसामान्य पातळीपेक्षा जरा जरी वाढला तरी नंतरच्या काळात हृदयाच्या समस्या उत्पन्न होण्यास कारणीभूत ठरू शकतो. त्यामुळे वर्षातून किमान एकदा स्वतःचा रक्तदाब तपासून घ्या. जर तुमचा रक्तदाब एकदा जरी १२०/८० पेक्षा जास्त असेल तर डॉक्टरचा सल्ला नक्की घ्या.
कोलेस्टेरॉल कमी करा कोलेस्टेरॉल जास्त असेल तर हृदय विकारांचा धोका वाढतो. खूप जास्त साखर आणि प्रक्रिया केलेले अन्नपदार्थ कोलेस्टेरॉल वाढवतात. जीवनशैली आणि आहारामध्ये आरोग्यदायी बदल घडवून आणून कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवता येते. संतुलित आहार व शारीरिक व्यायाम याने कोलेस्टेरॉल नियंत्रणात आणणे शक्य नसेल तर तुमचे डॉक्टर औषधे सुचवू शकतील.परंतु रुग्णाची अवस्था गंभीर झाली तर वैद्यकीय देखभाल मिळावी यासाठी रुग्णालयात भरती होणे गरजेचे आहे जेणेकरून रुग्णावर चोवीस तास जवळून लक्ष ठेवले जाईल आणि तो अधिक चांगल्या प्रकारे लवकर बरा होऊ शकतो.
धूम्रपान बंद करा धुम्रपानामुळे फक्त फुफ्फुसांनाच नव्हे तर, हृदयाला देखील धोका निर्माण होतो. धुम्रपानामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. धूम्रपान करणाऱ्या व्यक्तीला हृदय विकार होण्याचा धोका इतरांपेक्षा तीन ते चार पटींनी जास्त असतो. खूप उशीर होण्याआधीच धूम्रपान कायमचे बंद करा.
अति प्रमाणात बॉडी बिल्डिंग बंद करा
स्नायू बनवण्यासाठी भरपूर प्रमाणात प्रोटीन असलेला आहार, पाणी कमी पिणे आणि रात्री उशिरा झोपणे या सर्व गोष्टी एकत्र आल्या की शरीराचे जैविक घड्याळ बिघडते व मेटॅबोलिजमवर परिणाम होतो. यामुळे हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये क्लॉट्स तयार होऊ लागतात आणि पुढे जाऊन हार्ट अटॅक येण्याची शक्यता वाढते.
वजन नियंत्रित राखले जावे यासाठी प्रयत्न करा तरुणांमध्ये स्थूलपणा वाढत चालला आहे. संतुलित आहार व शारीरिक व्यायाम ही स्थूलपणा व हृदय विकार दूर ठेवण्याची प्रभावी शस्त्रे आहेत. भाज्या, फळे, वेगवेगळी धान्ये, कडधान्ये, अंडी, चिकन, मासे व दाणे यांचा समावेश असलेला, सर्व आवश्यक पोषकांनी परिपूर्ण आहार व दर आठवड्याला कमीत कमी १५० मिनिटे शारीरिक व्यायाम यामुळे हृदय विकार होण्याचा धोका कमी होतो.
ताणतणाव कमी करा ताण वाढला तर रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी यामध्ये वाढ होते आणि हे दोन्ही घटक हृदय विकारांना आमंत्रण देणारे आहेत. व्यायाम, ध्यान, योगासने आणि नियमित झोप यांचा आपल्या दिनचर्येत समावेश करून तुम्ही ताणतणावांना दूर ठेवू शकता. अशाप्रकारे तुम्ही तुमचे हृदय निरोगी राखू शकाल.
झोप
रोजच्या रोज किमान ७ तास शांत झोप ही मेंदू व स्नायू यांचा शीण घालवून, ताणतणाव कमी करण्यासाठी व शरीर पुन्हा नव्याने ताजेतवाने होण्यासाठी आवश्यक असते.
कौटुंबिक पार्श्वभूमी
तुमच्या कुटुंबात आधी कोणाला हृदय विकार झालेला असेल तर वयाच्या २५व्या वर्षीपासून वर्षातून एकदा किंवा दोनदा हृदय विकारांसाठी जेनेटिक स्क्रीनिंग, ईसीजी आणि इकोकार्डिओग्राफी करवून घेतल्याने तुम्ही हृदय विकारांना येण्यापासून रोखू शकाल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, छातीत दुखत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका, तो हार्ट अटॅक असू शकतो.
(लेखक डॉ. नंदकिशोर कपाडिया हे कोकिलाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये अडल्ट कार्डियाक सर्जरी विभागाचे प्रमुख आहेत.)