कोलकाता – पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे डॉक्टरांनी एका रुग्णाच्या पोटातून तब्बल १० किलोचा ट्यूमर (Tumour) काढला. कोलकाताच्या लायन्स हॉस्पिटलमध्ये २ ऑक्टोबरला हे अत्यंत जटील ऑपरेशन करण्यात डॉक्टरांना यश आले. जवळपास ४ तास ऑपरेशन सुरू होते. डॉक्टरांना रुग्णाचा जीव वाचवण्यात यश आले. सध्या रुग्णाची प्रकृती स्थिर असून त्याला आरामाचा सल्ला दिला आहे.
२ महिन्यापासून पोटात वेदना
कोलकाता येथे राहणाऱ्या ४५ वर्षीय अर्नब मुखर्जी यांच्या गेल्या २ महिन्यापासून पोटात वेदना होत असल्यानं दुखत होतं. डॉक्टरांनी सुरुवातीला तपासलं परंतु त्यांना ट्यूमरबाबत शोध लावण्यास अपयश आलं. जोपर्यंत पोटातील आजाराचा शोध लागला तोवर ट्यूमरचा आकार बराच वाढला होता.
फुटबॉलच्या चेंडूच्या आकाराचा ट्यूमर
अर्नब मुखर्जी व्यवसायाने संगीतकार आहेत. पोटात वेदना होत असल्याने अर्नब कोलकाता येथील व्हिक्टोरिया मेडिकल सेंटर येथे तपासणीसाठी गेले. तेव्हा डॉक्टरांनी सोनोग्राफी करुन त्यांच्या पोटात २२lbs म्हणजे १० किलो वजनाचा जीवघेणा ट्यूमर असल्याचं सांगितले. या ट्यूमरचा आकार फुटबॉलच्या चेंडूपेक्षाही मोठा असल्याचं डॉक्टर म्हणाले. त्यानंतर अर्नब मुखर्जी यांना लायन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. त्याठिकाणी डॉ. माखन लाल साहा आणि त्यांची मुलगी प्रियंका साहा यांनी यशस्वीरित्या रुग्णावर उपचार करून ट्यूमर बाहेर काढला.
हा दुर्मिळ आजार
डॉ. माखन लाल साहा म्हणाले की, हा एक महत्त्वाचा आणि दुर्मिळ आजार आहे. पहिल्या टप्प्यात ट्यूमर असल्याचं समजलं नाही. हे समजून घेण्यासाठी खूप प्रकारच्या चाचण्या कराव्या लागतात. ऑपरेशनवेळी रुग्णाचा जीव धोक्यात होता कारण ट्यूमरचा आकार खूप मोठा होता. दोन सर्जनच्या एका टीमने कॅन्सरच्या ट्यूमर हटवण्यासाठी मदत केली. ज्याला रेट्रोपेरिटोनियल सार्कोमा म्हटलं जातं. सर्जरी यशस्वी झाल्यानंतरही अर्नबला आता कॅन्सरचे उपचार घ्यावे लागणार आहेत.
शरीरातील कुठल्याही भागाला नुकसान नाही
डॉक्टर माखन यांनी सांगितले की, ट्यूमर काढण्यासाठी ४ तास ऑपरेशन करावे लागले. ही अत्यंत कठीण सर्जरी होती. आम्ही यशस्वीरित्या ट्यूमर बाहेर काढला इतकचं नाही तर शरीराच्या कुठल्याही भागाला यामुळे नुकसान झालं नाही. ट्यूमर खूप घातक होता आता तो किमो आणि कॅन्सर संबंधित अन्य औषधांचा वापर उपचारासाठी केला जाणार आहे.