सुनील काकडे
वाशिम : कुठल्याही आजाराचे निदान झाल्यानंतर आजार बरा करण्यासाठी लागणारी औषधी डाॅक्टरांच्या अधिकृत प्रिस्क्रिप्शनशिवाय देता येत नाही. मेडिकल्स चालकांकडूनही परस्पर अशी कुठलीही औषधी दिली जात नाही; मात्र हल्ली ऑनलाईन बाजारात प्रिस्क्रिप्शनशिवाय कोणतेही औषध मिळत आहे. गर्भपाताच्या गोळ्यांचादेखील त्यात समावेश आहे. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशी औषधी घेणे जीवघेणे ठरू शकते.
गेल्या काही वर्षांत विविध स्वरूपातील कंपन्यांकडून ऑनलाईन औषध विक्रीचा धंदा केला जात आहे. मेडिकलवर गेल्यास डाॅक्टरांचे प्रिस्क्रिप्शन मागितले जाते; मात्र ऑनलाईन बाजारात त्याची कुठलीच गरज राहिलेली नाही. हा प्रकार दिवसागणिक गंभीर होत चालल्याचे दिसत आहे.
गर्भपाताच्या गोळ्या ऑनलाईन
ऑनलाईन पद्धतीने थाटण्यात आलेल्या दुकानांमध्ये कुठल्याही गोळ्या, औषधीची मागणी केल्यास ते घरच्या पत्त्यावर विनासायास पाठविले जाते. गर्भपाताच्या गोळ्या मेडिकलवर डाॅक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय दिले जात नाही; मात्र ऑनलाईन मार्केटमध्ये प्रिस्क्रिप्शनची गरजच भासत नाही.
गर्भ टाळण्यासाठीच्या गोळ्याही ऑनलाईन
गर्भ ठेवण्याची इच्छा नसूनही गर्भ राहिल्यास तो टाळण्याचा अनेकांचा प्रयत्न असतो; मात्र त्यासाठी लागणाऱ्या गोळ्या मेडिकलवरून दिल्या जात नाहीत. अशा लोकांसाठी ऑनलाईन औषध विक्रीचा बाजार सोयीचा ठरत असून, गर्भ टाळण्यासाठीच्या गोळ्या ऑनलाईन उपलब्ध होत आहेत.
अशा औषधींची विक्री ऑनलाईन कशी?
मेडिकलमधून कुठल्या गोळ्या, औषधींची विक्री करायची हे शासनाने ठरवून दिले आहे. काही औषधींच्या विक्रीवर सक्तीने निर्बंधदेखील लादण्यात आले आहेत. दुसरीकडे गर्भपाताच्या गोळ्या (एमटीबी कीट), झोपेच्या गोळ्या (नार्कोटिक्स ड्रग), नशेची औषधी (उदा. कोरेक्स) यासारखी विक्रीस बंदी असलेली औषधी ऑनलाईन पद्धतीने सहज कशी उपलब्ध होते, याचेही उत्तर मिळायला हवे. - राजेश पाटील शिरसाट (अध्यक्ष), केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशन
शरीरासाठी धोकादायक असलेल्या अनेक प्रकारच्या औषधींची मेडिकलमधून विक्री करण्यावर निर्बंध लादण्यात आलेले आहेत. रेकाॅर्ड मेंटेन असावे, फार्मसीस्टच्या देखरेखीखाली औषध विक्री व्हावी, यासह इतरही अनेक प्रकारचे नियम घालून दिले आहेत. दुसरीकडे ऑनलाईन औषध विक्रीच्या बाजारात कुठलेही औषध उपलब्ध होत आहे. त्याचे अनेक साईडइफेक्ट असूनही कानाडोळा होत आहे. - नंदकिशोर झंवर (सचिव), केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशन