Water Boiling Tips : पाणी हे जीवन आहे. पाणी शरीरासाठी आणि जीवन जगण्यासाठी फार महत्वाचं असतं. पण आजकाल पाणी फार दूषित होत चाललं आहे. यात अनेक केमिकल्स, विषारी तत्व आढळतात. अशात पाणी फिल्टर करून पिण्याचा सल्ला दिला जातो. फार पूर्वीपासून पाणी शुद्ध करण्यासाठी ते उकळलं जातं. सोबतच कोमट पाणी प्यायल्याने शरीरालाही अनेक फायदे मिळतात. मात्र, एक महत्वाची बाब म्हणजे पाणी वेगवेगळ्या पद्धतीने उकळलं जाऊ शकते आणि याचे फायदेही वेगवेगळे मिळतात.
आयुर्वेदिक एक्सपर्ट तन्मय गोस्वामी यांनी पाणी उकळण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती आणि त्याचे फायदे सांगितले आहेत. आयुर्वेदानुसार, पाणी वेगवेगळ्या पद्धतीने उकळून प्यायल्याने वात, कफ आणि पित्त दोषामुळे होणाऱ्या आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या दूर करण्यास मदत मिळते.
पाणी उकळण्याच्या वेगवेगळ्या पद्धती
- जर पाणी एक चतुर्थांश शिल्लक राहण्यापर्यंत उकळलं तर याने वात दोष दूर होतो.
- जर पाणी अर्ध कमी होईपर्यंत उकडलं तर याने पित्त दोष कमी होतो.
- जर पाणी उकळल्यानंतर केवळ एक चतुर्थांश शिल्लक राहीलं तर याने कफ दूर होतो.
अशाप्रकारे पाणी उकळून प्यायल्याने पचनक्रिया सुधारते, भूक वाढते आणि तापही कमी होतो.
कफ दोषाची लक्षणं
कफ दोष असंतुलित झाल्यावर शरीरावर चिकटपणा जाणवतो. कफ जमा होणे, श्वास घेण्यास त्रास होणे, खोकला, चिकट घाम, शरीर जड वाटणे, सुस्ती, आळस, जास्त झोप येणे अशी लक्षणं दिसतात.
पित्त दोषाची लक्षणं
पित्त वाढल्यावर व्यक्तीला फार जास्त थकवा जाणवतो, जास्त झोप येते, शरीरात जळजळ होते, जास्त गरमी लागते, जास्त घाम येतो, शरीरातून दुर्गंधी येते, चिडचिड जास्त होते, चक्कर येते, लघवी पिवळी येते, डोळेही पिवळे दिसू लागतात.
वात दोषाची लक्षणं
वात दोषाला हवेशी जोडण्यात आलं आहे. वात असंतुलित झाला तर पोट खराब होतं, बद्धकोष्ठता होते, पोटात दुखतं, गॅस होतो, तोंडाची चव कडवट होते, हाडांमध्ये वेदना होतात.