Healthy Seeds : आजकाल लोक आरोग्य चांगलं ठेवण्याबाबत आणि शरीर फिट ठेवण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. शरीराला फायदे मिळणाऱ्या अनेक पौष्टिक गोष्टींचा आहारात समावेश करतात. वेगवेगळ्या पालेभाज्या आणि फळांचं सेवन लोक करतात. यातच आता लोकांनी त्यांच्या आहारात काही बियांचा देखील समावेश केला पाहिजे. जेणेकरून शरीराला भरपूर पोषक तत्वे मिळतील. डायटिशिअन मनप्रीत कालरा यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून काही बियांचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला आहे.
शरीरासाठी फायदेशीर बीया
बडीशेप - बडीशेप खाल्ल्याने पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात. सोबतच पचनही चांगलं होतं. बडीशेपच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्याही लगेच दूर होते.
भोपळ्याच्या बीया - भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशिअम भरपूर असतं आणि या बियांचं सेवन केल्याने इन्सुलिन सेंन्सिटिविटी अधिक चांगली होते. या बीया तुम्ही वाळवून भाजून खाऊ शकता.
सूर्यफुलाच्या बीया - या बियांमध्ये सेलेनिअम असतं जे मेटाबॉलिज्म मजबूत करतं. याने तुम्हाला वजन कमी करण्यास मदत मिळेल. या बीया तुम्ही भाजून खाऊ शकता.
तीळ - तिळाचं सेवन तुम्ही वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टाकून करू शकता. तिळाचे लाडूही खाऊ शकता. या बियांमध्ये कॅल्शिअम भरपूर असतं ज्यामुळे हाडे मजबूत होतात.
हलीमच्या बीया - हलीमच्या बियांमध्ये आयर्न भरपूर असतं. ज्यामुळे आरोग्याला फायदे मिळतात. सोबतच यांच्या सेवनाने केसगळतीही कमी होते. याचं सेवन तुम्ही नारळ पाण्यासोबत करू शकता.
अळशीच्या बीया - अळशीच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अॅसिड असतं जे कॉलेस्ट्रोल लेव्हल कमी करण्यास मदत करतं. या बीया तुम्ही बारीक करून गव्हाच्या पीठात टाकून खाऊ शकता.
धणे - वेगवेगळ्या पदार्थांमध्ये धण्याच्या बियांचा वापर करून सेवन करू शकता. या बियांच्या सेवनाने थायरॉइडचं काम चांगलं होतं. वॉटर रिटेंशनची समस्याही दूर होते.
तुळशीच्या बीया - शरीर डिटॉक्स करण्यासाठी किंवा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यासाठी तुळशीच्या बियांचं पाणी पिऊ शकता. यात फायबर भरपूर असतं ज्याने पोटासंबंधी समस्या दूर होतात.
ओवा - ओव्यामध्ये थायमोल असतं. याच्या सेवनाने अपचन आणि ब्लोटिंगची समस्या दूर करण्यास मदत मिळते. जेवण झाल्यावर याचं सेवन करावं. पदार्थांमध्येही यांचा वापर करू शकता.