भारतात रोजच्या आहारात डाळींचा खूप वापर केला जातो. डाळींची टेस्ट तर चांगली असतेच सोबतच यातून शरीराला अनेक पोषक तत्वही मिळतात. वेगवेगळ्या डाळींमध्ये प्रोटीन, फायबर, व्हिटॅमिन, मिनरल्स आणि पोषक तत्व भरपूर असतात. नियमितपणे डाळींचं सेवन केल्यास पचनक्रिया चांगली होते, हृदय निरोगी राहतं, बीपी आणि शुगर कंट्रोल होते, वजन कमी होतं आणि कॅन्सरपासूनही बचाव होऊ शकतो.
डाळ सामान्यपणे रोज सगळ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खाल्ली जाते. सगळेच लोक डाळ एकाच पद्धतीने बनवतात. जसे की, डाळीमध्ये पाणी टाकून ती उकडतात आणि नंतर फोडणी दिली जाते. मात्र, न्यूट्रिशनिस्ट आणि डायटिशिअन शिखा अग्रवाल शर्मा यांच्यानुसार डाळ बनवण्याची ही पद्धत चुकीची आहे. त्यांनी डाळ बनवण्याची योग्य पद्धत सांगितली आहे आणि त्याची काही कारणेही सांगितली आहेत.
जर तुम्हाला डाळीपासून जास्त फायदे मिळवायचे असतील किंवा पचन आणि पोषणाचं अवशोषण अधिक चांगलं करायचं असेल तर डाळ आधी पाण्यात भिजवून ठेवली पाहिजे. याने डाळ जास्त पौष्टिक आणि टेस्टी बनते. अशात आज आम्ही तुम्हाला डाळ भिजवून खाण्याचे फायदे काय होतात हे सांगणार आहोत.
पोषक तत्वांचं अवशोषण
डाळीमध्ये काही तत्व असतात जसे की, टॅनिन आणि पॉलीफेनोल्स जे पचन आणि पोषक तत्वांच्या अवशोषणात अडचण निर्माण करतात. डाळ भिजवली तर हे तत्व कमी करण्यास मदत मिळते. डाळ भिजवून ठेवल्याने फायटिक अॅसिडचं प्रमाणही कमी होतं. फायटिक अॅसिडमुळे आयर्न, झिंक आणि कॅल्शिअमसारख्या पोषक तत्वाचं अवशोषण रोखलं जातं.
पचनक्रिया सुधारते
डाळ भिजवून ठेवल्यास ऑलिगोसॅकराइड सारख्या कठोर शुगरला तोडण्यास मदत मिळते, ज्यामुळे पोट फुगणे किंवा गॅसची समस्या होत नाही. याने डाळीचं पचन सहज होतं. डाळ भिजवून खाल्ल्यास लेक्टिन कमी होतं, ज्याने आतड्या जळण्याची भिती असते.
डाळ बनवण्याची योग्य वेळ
डाळ भिजवून ठेवल्याने ती मुलायम होते आणि लवकर शिजते. याने वेळही वाचतो आणि ऊर्जाही कमी लागते. भिजवलेली डाळ लवकर शिजते त्यामुळे डाळ बनवताना तुम्हाला पाणीही कमी लागतं.
दूषित तत्व कमी होतात
डाळ भिजवून ठेवल्याने त्यातील धूळ आणि माती निघून जाते. तसेच त्यातील कीटकही दूर होतात. इतकंच नाही तर त्यावर काही केमिकल्स असतील तर तेही दूर होतात.
टेस्ट सुधारते
भिजवलेली डाळ समान रूपात शिजण्यास मदत मिळते. तसेच भिजवलेल्या डाळीची टेस्टही अधिक वाढते. म्हणजे काय तर कोणतीही डाळ शिजवण्याआधी पाण्यात भिजवून ठेवा आणि त्यानंतर बनवा. याने शरीराला अनेक फायदे मिळतील.