आजकाल धावपळीच्या जीवनात चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी आणि सुस्त जीवनशैलीमुळे लोकांना गॅस, अॅसिडिटी, अपचन, बद्धकोष्ठता आणि पोट फुगण्याच्या समस्या होतात. ज्यामुळे इतरही अनेक आजारांचा सामना करावा लागतो. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की, जास्तीत जास्त आजार हे पोटापासूनच सुरू होतात.
जर तुमची पचनक्रिया चांगली नसेल किंवा पोट खराब असेल तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी पुन्हा पुन्हा औषधांचा वापर करणंही पोटाच्या आरोग्यासाठी चांगलं नसतं. यासाठी काही घरगुती उपायही बेस्ट ठरतात. जर स्थिती फारच वाईट असेल तर मग डॉक्टरांकडे जा.
सेलिब्रिटी न्यूट्रिशनिस्ट आणि डायटीशिअन रुजुता दिवेकर यांनी सीक्रेट्स ऑफ गुड हेल्थ सीझन 2 मध्ये पोट निरोगी आणि चांगलं ठेवण्यासाठी एक खास उपाय सांगितला आहे. या उपायात तीन गोष्टींचा समावेश करायचा आहे. ज्यात तूप, गूळ आणि केळीचा समावेश आहे. यांमुळे तुमचं पचन चांगलं होतं.
दुपारी गूळ आणि तूप खा
गूळ खाण्याचे आरोग्याला अनेक फायदे मिळतात. जर तुम्ही दुपारच्या जेवणात एक चमचा गूळ आणि तूपाचा समावेश केला तर तुमची पचनक्रिया सुधारते. तूपाने शरीराला हेल्दी फॅट मिळतं आणि गूळ तुमच्या साखरेच्या लालसेला कमी करण्यात मदत करतो. तसेच याने अनेक पोषक तत्वही मिळतात.
पोट चांगलं ठेवतात केळी
केळी खाल्ल्याने एनर्जी मिळते आणि सूजही कमी होते. रोज सकाळी किंवा सायंकाळी 4 ते 6 वाजेदरम्यान नाश्त्यात एक केळी खा. केळीमध्ये फायबर आणि इलेक्ट्रोलाइट्स असतात जे गॅस आणि सूज कंट्रोल करतात. तसेच दह्यामध्ये 3 ते 4 काळे मनुके टाकून खाल्ल्यास प्रीबायोटिक आणि प्रोबायोटिक गुणांच्या मिश्रणाने आपलं पचन वाढवू शकता. यामुळे डोकेदुखी आणि अॅसिडिटी कमी होते.
अॅक्टिव रहा
दररोज 30 मिनिटे पायी चालायला हवं कारण पायी चालल्याने पचनास मदत मिळते. अॅक्टिव राहिल्याने वातही कंट्रोल ठेवण्यास मदत मिळते. दुपारी 15 ते 20 मिनिटांसाठी एक झोप घ्या. कॅफीनचं सेवनही कमी करा. 3 किंवा 4 वाजतानंतर जास्त चहा किंवा कॉफीचं सेवन टाळा.