काही वर्षांपूर्वी डुकरापासून होणाऱ्या एच१एन१ व्हायरसचे संक्रमण आपण ऐकले होते. परंतू आता स्वाईन फ्ल्यूच्या H1N2 चा पहिल्यांदाच ब्रिटनमध्ये रुग्ण सापडला आहे. ब्रिटेनमध्ये एका व्यक्तीला या व्हायरसची लागण झाली आहे. हा डुकरांमध्ये आढळणारा विषाणू असून मानवी शरीरात सापडलेले ब्रिटनमधील हे पहिलेच प्रकरण आहे.
एकीकडे चीनमध्ये लहान मुले मोठ्या प्रमाणावर आजारी पडू लागली आहेत. यातच आता स्वाईन फ्ल्यूच्या दुसऱ्या व्हायरसने हजेरी लावल्याने आरोग्य यंत्रणांचे धाबे दणाणले आहेत. युकेची आरोग्य सुरक्षा यंत्रणा यूकेएचएसएने याची पुष्टी केली आहे.
उत्तरी यॉर्कशायरमधील एका व्यक्तीला श्वास घेताना त्रास होत होता, म्हणून त्याची चाचणी घेण्यात आली होती. यामध्ये तो स्वाईन फ्ल्यूचा फक्त डुकरांमध्येच आढळणारा स्ट्रेन एच1एन2 ने संक्रमित असल्याचे समोर आले आहे. हा व्हायरस कोणत्या व्यक्तीला संक्रमित करू शकतो हे पहिल्यांदाच समोर आले आहे.
धक्कादायक बाब म्हणजे ज्या व्यक्तीला याची बाधा झालेली आहे त्याचा डुकरांशी संबंध किंवा संपर्क असल्याचे आढळलेले नाहीय. त्याला स्वाईन फ्ल्यूची सौम्य लक्षणे होती, तो आता पूर्णपणे बरा झाला आहे. यामुळे युकेची आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. या व्हायरसचे आणखी किती रुग्ण असतील याचा शोध आरोग्य यंत्रणा घेत आहे.
H1N1, H1N2 आणि H3N2 हे डुकरांमध्ये स्वाइन फ्लूचे मुख्य प्रकार आहेत. ज्यामुळे मानवाला संसर्ग होऊ शकतो. हे सहसा आजारी डुकरांच्या संपर्कानंतर होऊ शकतात. 2005 पासून जागतिक स्तरावर H1N2 ची केवळ 50 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. 2009 मध्ये, H1N1 मुळे झालेल्या महामारीमुळे यूकेमध्ये 474 मृत्यू झाले होते. यानंतर जगभरात आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.