नवी दिल्ली - बदललेली जीवनशैली आणि कोरोना व्हायरसमुळे लोकांचे मानसिक आरोग्य बिघडत चालले आहे. गेल्या दोन वर्षांपासून मानसिक समस्या असलेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. यातील बहुतांश रुग्णांमध्ये चिंता आणि नैराश्याची लक्षणे दिसून आली आहेत. कोरोनाचा लोकांच्या शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. लोक शारीरिक आरोग्याकडे लक्ष देतात, परंतु मानसिक आरोग्याकडे नाही. त्यामुळे त्यांना इतर अनेक आजारांनाही सामोरे जावे लागत आहे. अशा परिस्थितीत लोकांनी त्यांच्या मानसिक आरोग्याबाबतही जागरुक असणे अत्यंत आवश्यक आहे. बिघडलेल्या मानसिक आरोग्याची लक्षणे कोणती आहेत आणि ते कसे टाळावेत हे तज्ञांकडून जाणून घेऊया.
दिल्लीच्या अपोलो रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. संदीप वोहरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवनशैलीतील बदलांमुळे प्रत्येक वयोगटात मानसिक समस्या सातत्याने वाढत आहेत. डॉक्टरांच्या मते शरीरात ही समस्या हळूहळू वाढत जाते आणि वेळीच काळजी घेतली नाही तर ती खूप गंभीर बनते. जरी त्याची सुरुवातीची लक्षणे सहजपणे शोधली जाऊ शकतात. जर एखाद्याच्या वागण्यात अचानक बदल झाला असेल किंवा त्या व्यक्तीने स्वतःला इतर लोकांपासून दूर ठेवण्यास सुरुवात केली असेल, मनात नेहमी थोडी भीती असते, तर ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक रिसर्च केला असून यामध्ये कोरोना महामारीनंतर जगभरात चिंता आणि नैराश्याची प्रकरणे 25 टक्क्यांनी वाढली आहेत असं म्हटंल आहे. लहान मुले असोत, वृद्ध असोत किंवा ऑफिसला जाणारे तरुण असोत, प्रत्येकाच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम झाला आहे. झोप न लागणे, अस्वस्थता, चिंता, तणाव आणि भूक न लागणे यासारख्या समस्या आता सामान्य झाल्या आहेत असं देखील म्हटलं आहे. कोरोनाच्या काळात अनेक रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी येण्याचे टाळत होते. अशा रुग्णांसाठी टेली-मानसोपचार खूप फायदेशीर असल्याचे सिद्ध झाले आहे.
अलीकडे टेली-सायकॅट्रीची सुविधा घेणाऱ्या अशा रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या माध्यमातून रुग्ण घरी बसून डॉक्टरांचा सल्ला घेत आहेत. इतर रुग्णांनीही जास्तीत जास्त या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे जगभरातील मानसिक आरोग्य समस्या सोडवण्याचे उद्दिष्ट साध्य होईल आणि मानसिक आजारांच्या प्रकरणांना आळा बसेल असंही म्हटलं आहे. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, लोकांना वाटते की जर त्याने त्याच्या मानसिक समस्या कुटुंबीय किंवा मित्रांसोबत शेअर केल्या तर लोक त्याला मानसिक रुग्ण समजतील, परंतु त्याने असा विचार करू नये. तुमची कोणतीही समस्या तुम्ही शेअर केली पाहिजे आणि योग्य वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा हे महत्त्वाचे आहे.
ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. राजकुमार श्रीनिवास सांगतात की, असे अनेक लोक आहेत जे अनेक महिने किंवा वर्षानुवर्षे डिप्रेशनमध्ये असतात, पण त्यांना त्याबद्दल माहिती नसते. जेव्हा परिस्थिती गंभीर होते. कोरोनाच्या काळात भीती आणि भविष्याची चिंता यामुळे अशा प्रकरणांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. या विषाणूचा लोकांच्या मेंदूवरही परिणाम झाल्याचे अनेक अभ्यासांमध्ये आढळून आले आहे. मानसिक आजाराची लक्षणे शरीरात येऊ न देणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. हे टाळण्यासाठी नेहमी सकारात्मक विचार करा, तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा. विनाकारण काळजी करू नका, रोज झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करा आणि योगाची मदत घ्या. हे सर्व करूनही तुमचे मानसिक स्वास्थ्य ठीक होत नसेल, तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या.
'ही' आहेत मानसिक समस्यांची लक्षणे
- नेहमी एकटे राहण्याचा प्रयत्न करणं
- वाईट विचार
- जे काम तुम्ही उत्तमरित्या करू शकता. त्यात मन न लागणं.
- अचानक राग येणे
- दारू आणि इतर हानीकारक गोष्टींचं सेवन
- लक्ष न लागणं
- निद्रानाश
- आत्महत्येचे विचार येणं
- भविष्याबद्दल नकारात्मक दृष्टीकोन असणं
- अस्वस्थता आणि भीती वाटणे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.