(Image Credit : www.scienceabc.com)
लसूण आरोग्यासाठी वेगवेगळ्या दृष्टीने फायदेशीर असतो. त्याचप्रमाणे कांद्याचे गुणही कुणापासून लपले नाहीयेत. तज्ज्ञ या दोन्हींचा आहारात समावेश करण्याचा आवर्जून सल्ला देतात. आयुर्वेदात तर यांना औषधी मानलं आहे. लसणाचा आणि कांद्याचा वेगवेगळे आजार दूर करण्यासाठी फायदा होतो. पण अनेकांना लसूण आणि कांदा खाल्ल्यावर तोंडातून येणाऱ्या दुर्गंधीने त्रास होतो. जर तुम्हालाही ही समस्या असेल तर तोंडाची दुर्गंधी घालवण्यासाठी आम्ही काही उपाय तुम्हाला सांगणार आहोत.
करा हे उपाय...
ग्रीन टी - जर कांदा किंवा लसूण खाल्ल्यावर तोंडाची दुर्गंधी येत असेल तर ही समस्या दूर करण्यासाठी एक कप ग्रीन टी सेवन करा. याने तोंडाची दुर्गंधी दूर होईल. ग्रीन टी मध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट, पॉलीफेनोल्स आणि फ्लेवोनॉइड्स भरपूर प्रमाणात असतात. याने अनेक फायदेही होतात. ग्रीन टी मुळे तोंडाची दुर्गंधी तर दूर होतेच सोबतच याने हृदय निरोगी राहतं, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहतं, पचनक्रिया सुधारते. अनेक संशोधनातून ही बाब समोर आली आहे की, ग्रीन टी मुळे तोंडाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते.
लिंबाचा रस - तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी सर्वात चांगला उपाय म्हणजे लिंबाचा रस. लसूण खाल्ल्यानंतर जर तुमच्या तोंडातून दुर्गधी येत असेल तर लगेच लिंबाचा रस सेवन करा. लिंबाच्या रसात सिट्रिक अॅसिड अशतं, ज्याने लसणाचा वास दूर होतो.
सफरचंद खा - जर तुम्ही लसूण किंवा कांदा खाल्ला असेल आणि याने तोंडातून दुर्गधी येत असेल हा सुद्धा एक सोपा उपाय आहे. ही समस्या दूर करण्यासाठी तुम्ही सफरचंद खाऊ शकता. अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, सफरचंदमध्ये असलेल्या केमिकल्समुळे तोंडाची दुर्गंधी दूर केली जाऊ शकते.