मुंबई : कावीळ या आजाराबाबत बहुतेकांच्या मनात गैरसमज असतात किंवा कावीळबद्दल चुकीची माहिती असते. खूपदा अर्धवट माहिती किंवा अघोरी उपचारांमुळे हा आजार वाढण्याचा धोका असतो. त्यामुळे वेळीच निदान आणि उपचारांवर भर द्यावी, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
रुग्णांनी काय करू नये?
जास्त प्रमाणात व रोज दारू पीत राहिल्याने यकृताच्या पेशींना इजा होते. तसेच यकृताला सूज येते. त्यामुळे कावीळ होते. या काविळीमध्ये यकृताला सूज येणे. पोटात पाणी होणे. सतत आजारी वाटणे अर्थात डोळे पिवळे होणे ही लक्षणे दिसतात. रक्त तपासणी करून या काविळीचे निदान करता येते. या काविळीमध्ये शेवटी यकृत सिरोसिस होते. म्हणजे यकृतच छोटे होते. सर्व यकृताच्या पेशी जाऊन फायबरचे धागे राहतात. त्यामुळे यकृताचे काम एकदम कमी प्रमाणात चालते आणि रुग्ण भ्रमिष्ट होऊ शकतो. बेशुद्ध होऊ शकतो.
रुग्णांनी काय करावे?
रुग्णांनी विश्रांती घ्यावी. आराम करावा. साधा आहार घ्यावा. यामध्ये कमी तेलाचे आणि पचायला सोपे असे जेवावे. शाकाहारी जेवण जेवावे. यामध्ये मऊ भात, खिचडी, फुलके, कमी तेलाच्या भाज्यांचे सेवन करावे. सोबत बी कॉम्प्लेक्स, यकृताची टॉनिक्स ही घ्यावीत. या आजारात यकृतातील ग्लुकोज कमी होते म्हणून ग्लुकोज पावडर घ्यावी. ऊस खावा. हिपेटायटिस बी/सी – यामध्ये रक्ततपासणी आणि डीएनए याची तपासणी करून जर त्यामध्ये हिपेटायटिस ॲक्टिव्ह असेल तर ॲण्टी व्हायरल ड्रग्ज देणे आवश्यक असते.
कावीळ झाल्याचे समजल्यावर घरगुती औषधे घेऊन ती बरी करण्याकडे अनेकांचा कल असतो. कावीळ बरा करण्याच्या नावावर कानात औषध टाकणे, नाकात औषध टाकणे, कावीळ झाडणे, पानात औषध देणे, उलटीद्वारे कावीळ काढणे, शौचातून कावीळ काढणे, लघवीतून कावीळ काढणे हे प्रकार केले जातात. वास्तविक असे करणे धोक्याचे असते. काविळीचे योग्य निदान आणि त्यावर त्वरित उपचार केल्याने बहुतांशी रुग्ण बरे होतात. पण, हे सारे डॉक्टरच्या देखरेखीखाली करावे. - डॉ. आराधना खडपे