वायु प्रदूषणामुळे लोकांच्या आरोग्यावर किती आणि कसा परिणाम होतोय, हे आपणा सर्वांना नेहमीच वाचायला मिळतं. पण नेमका काय प्रभाव पडतो, हे दाखवणारा एक रिसर्च नुकताच करण्यात आलाय. साधारण ३ लाख लोकांवर ५ वर्ष करण्यात आलेल्या रिसर्चमध्ये वायु प्रदूषणाचा आपल्या फुप्फुसावर किती वाईट परिणाम होतो, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि यातून समोर आलेले निष्कर्ष धक्कादायक आहेत. या रिसर्चमधून समोर आलं आहे की, वायु प्रदूषणामुळे मनुष्याच्या फुप्फुसाचं वय वाढवत आहे.
वेगाने घटत आहे फुप्फुसाच कार्यक्षमता
फुप्फुसाचं वय वाढत असल्याने फुप्फुसं वेळेआधीच कमजोर होत आहेत आणि शरीराच्या सर्वच क्रियांसाठी आवश्यक ऑक्सिजनची प्रोसेस करण्याची क्षमता घटते आणि ब्लड सर्कुलेशन सुद्धा याने प्रभावित होतं. वायु प्रदूषणामुळे केवळ फुप्फुसंच कमजोर होत नाहीये तर क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव पल्मनरी डिजीज होण्याचा धोकाही अनेक पटीने वाढत आहे. या आजारामुळे फुप्फुसांमध्ये जळजळ आणि सूज येऊ लागते. ज्यामुळे श्वासनलिका हळूहळू लहान होऊ लागते. याने श्वास घेण्यासही त्रास होऊ लागतो.
४५ वर्षाच्या व्यक्तीचे फुप्फुसं ६१ वर्षीय व्यक्तीसारखे
हवेत असलेल्या PM2.5 वायु प्रदूषणामुळे दरवर्षी तुमचे फुप्फुसं २ वर्ष अधिक वृद्ध होत आहेत आणि फुप्फुसांची कार्यक्षमताही वेगाने घटत आहे. अशात जर तुम्ही ४५ वर्षाचे असाल तर तुमचे फुप्फुसं ६१ वर्षाच्या व्यक्तीच्या फुप्फुसांसारखे होतात आणि यासाठी जबाबदार दरदिवशी वाढतं प्रदूषण आहे.
वायु प्रदूषणामुळे एजिंग प्रोसेसचा वाढतोय वेग
(Image Credit : Office on Women's Health)
युरोपियन रेस्पिरेटरी नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, तशी तर आपल्या वाढत्या वयासोबत फुप्फुसाची कार्यक्षमता कमी होऊ लागतो. पण वायु प्रदूषणामुळे एजिंग प्रोसेस म्हणजे वयवृद्धीची प्रक्रिया वेगाने होत आहे आणि फुप्फुसाला याचा सर्वात जास्त फटका बसत आहे. या रिसर्चमध्ये सहभागी लोकांचे लिंग, बॉडी मास इंडेक्स, उत्पन्न, शिक्षण, स्मोकिंग स्टेटस आणि सेकंड हॅन्ड स्मोक या गोष्टींची तपासणी करण्यात आली.