मुंबई : ‘संसारास उद्ध्वस्त करी दारू, बाटलीस स्पर्श नका करू’ हे वाक्य अनेकदा वाचायला-ऐकायला मिळते. ते काही अंशी सत्य आहे. हिवाळ्यात शरीराला उष्णता मिळावी, यासाठी अनेकजण दारूचे सेवन करतात. परंतु, थंडीच्या मौसमात अतिमद्यपान करणे हृदयासाठी घातक ठरू शकते. त्यामुळे ‘आरोग्यास’ उद्ध्वस्त करी दारू, असे म्हटले तर वावगे होणार नाही. मद्यपान केल्याने शरीराचे कोअर तापमान कमी होते आणि हायपोथार्मियाचा धोका वाढतो. म्हणूनच थंडीच्या दिवसात हृदयाची काळजी घेण्यासाठी मद्यपान टाळा, रक्तातील साखरेची पातळी व रक्तदाब तपासून पहा, असे आवाहन तज्ज्ञ डॉक्टर करतात.
अतिमद्यपानाचा हृदयावरच नव्हेतर शरीरावरही विपरित परिणाम होतो. जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने हृदयाच्या स्नायूंना नुकसान होऊन ती कमकुवत होतात. ज्यामुळे हृदयाचे पंपिंग व्यवस्थित होत नसल्याने हृदयाचा झटका येऊ शकतो.
हिवाळ्यात थंडीमुळे अनेक जण दारूचे सेवन करत असल्याने त्यांना हृदयाची समस्या उद्भवत असल्याचे दिसून येत आहे. बहुतांश रूग्ण उच्च रक्तदाब, मधुमेह, रक्तवाहिन्यांचे नुकसान अशा तक्रारी घेऊन उपचारासाठी येतात. मधुमेहामुळे उच्च रक्तदाब आणि उच्च कोलेस्ट्रॉलची शक्यता वाढते.
जीवनशैलीत योग्य तो बदल केल्यास हृदयविकाराची समस्या टाळता येऊ शकते. यासाठी नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. हृदयाची समस्या असलेल्यांनी अधिक व्यायाम करणे टाळावे, धूम्रपान व मद्यपान करू नयेत, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ खाणे टाळावेत. हृदयविकारापासून बचाव करण्यासाठी हृदयाची तपासणी करणे आवश्यक आहे. छातीत दुखणे आणि जडपणा, अशक्तपणा, यासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन केले आहे.
मद्यविक्री १३ टक्क्यांनी वाढली:
गेल्या काही महिन्यांपासून मद्यविक्री वाढल्याने राज्यातील बिअरच्या विक्रीत १३ टक्केपेक्षा जास्त लक्षणीय वाढ झाली आहे, तर भारतीय बनावटीचे विदेशी मद्य आणि देशी दारूच्या विक्रीत किंचित घट झाली आहे. या वर्षात आतापर्यंत राज्यातील दारूच्या एकूण विक्रीत ७.२९ टक्के वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यांत ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत १९.२५ कोटी लिटरची विक्री नोंदवली गेली, जी गेल्या आर्थिक वर्षात याच कालावधीत १२ कोटी लिटर होती.
थंडीमध्ये शरीरातील रक्तवाहिन्या आखडतात. त्यामुळे रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही. त्यात जर अति मद्यसेवन केले तर हृदयावर आणि शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्याचबरोबर धूम्रपान, बदललेली जीवनशैली यामुळे देखील हृदयरोगाचा धोका वाढतो. म्हणूनच थंडीच्या दिवसांमध्ये हृद्यविकारांचे प्रमाण वाढलेले दिसते. हे सर्व टाळायचे असेल तर सर्वप्रथम मद्यपान, धूम्रपान बंद करावे. तसेच जितक्या लवकर शक्य असेल तितक्या लवकर जीवनशैली बदलण्याचा प्रयत्न करावा. - डॉ. हरेश मेहता, हृदयरोगतज्ज्ञ