जळगाव : कोरोना विषाणूमध्ये जनुकीय बदल दिसून येत असल्याने व विषाणूच्या स्पाईक प्रोटीनमध्ये बदल झाल्यामुळे व्यक्तीला यापूर्वी कोरोना झाला असला तरी त्याला दुसऱ्या लाटेत कोरोनाचा धोका कायम असून, त्यामुळे कोणीही निष्काळजीपणा करू नये, नियम सर्वांनी पाळावेत, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तज्ज्ञांनी म्हटले आहे.
दुसऱ्या लाटेने अचानक गंभीर रूप धारण केले आहे. यात अनेक तर्कवितर्क लढविले जात आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा हा नवा स्ट्रेन आहे का? याच्या तपासणीसाठी पुणे एनआयव्हीकडे ३० नमुने पाठविण्यात आले आहेत. मात्र, त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. आधी कोरोना झालेल्या अनेक व्यक्ती आपल्याला कोरोना होणार नाही या आविर्भावात फिरून नियम पाळत नसल्याचे समोर येत असल्याने अशांनी पुरेशी काळजी घेणे महत्त्वाचे असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.
काय म्हणतात डॉक्टर?
औषध वैद्यक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. भाऊराव नाखले यांनी म्हटले आहे की, मानवाच्या शरीरात विषाणू प्रवेशित झाल्यास विषाणूच्या रचनेत सतत बदल होत असतात. या प्रक्रियेला ‘म्युटेशन’ असे म्हणतात. जेव्हा दोन म्युटेशन झालेले म्हणजेच जनुकीय बदल झालेले विषाणू एकत्र येऊन मूळ विषाणूच्या संपर्कात येतात तेव्हा मूळ विषाणूमध्ये बरेच बदल होतात. यालाच ‘डबल म्युटेशन’ म्हटले जाते. दुसऱ्या लाटेत कोरोनाचे हे असे डबल म्युटेशन असू शकते. त्यामुळे याचे गंभीर परिणाम दिसून येऊ शकतात. यात लसीकरण झालेले व यापूर्वी कोरोना झालेल्यांनाही पुन्हा कोरोना होऊ शकतो; मात्र, परिणाम घातक नसतात.
परिणाम कमी यानेच हाेतील
दुसरी लाट व त्याचे परिणाम कमी करायचे असल्यास व्यवस्थित मास्क परिधान करणे, हात स्वच्छ ठेवणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे या बाबी, हे नियम पाळल्यानेच याचा धोका रोखता येणार आहे, असेही डॉ. नाखले यांनी म्हटले आहे.