वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनामुळे अनेक गोष्टी बदलल्या आहेत. कोरोनानंतर आता लोक आणखी एका आजाराला बळी पडत आहेत. काही लोकांना रात्री अस्वस्थ वाटतं आणि दिवसा काम करणं कठीण होत आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. झारखंडच्या विकास बरनवाल यांनी कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर उपचारही करण्यात आले. पण आता देखील त्यांना त्याचा त्रास जाणवत आहे.
विकास यांनी छोट्या गोष्टीही आठवत नाहीत, त्यांना विसरण्याचा आजार झाला आहे. हात-पाय देखील थरतात. विकास जेव्हा डॉक्टरांना भेटले तेव्हा कोरोनामुळे रोग प्रतिकारशक्तीवर परिणाम झाल्याचं समोर आलं आहे. ही अल्झायमरची लक्षणं आहेत. हा एक असा आजार आहे ज्यामुळे अनेकदा झोप येण्यास त्रास होतो आणि रात्रभर अस्वस्थता जाणवते. लहान-मोठ्या गोष्टी सतत विसरल्याने दिवसभरात काम करताना अडचणी येतात.
कोरोनावर मात केलेल्या 20 टक्के लोकांना हा आजार विळखा घालत आहे. स्मृतीभ्रंशाने ग्रस्त लोक मोठ्या संख्येने रुग्णालयात येत आहेत. अशा रुग्णांवर रुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉ. मणि कुमार यांनी सांगितले की, हे सर्व काही कोरोनामुळे होत आहे. तरुणांमध्ये स्मृतीभ्रंशही होत आहे. अशा रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे.
जर आपण कोरोनावर मात करणार्या 100 रुग्णांवर नजर टाकली तर 20 रुग्णांमध्ये अल्झायमरची लक्षणं आहेत. साधारणत: हा आजार 65 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांनाच होतो, मात्र तरुण लोकही येथे उपचारासाठी येत आहेत. जगभरात या आजारावर अभ्यास सुरू आहेत. न्यूरोसर्जन डॉ. राजेश कुमार सिंह म्हणाले की, कोरोनामुळे रोग प्रतिकारशक्ती कमी झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्यांमध्ये तणाव वाढला आहे. यामुळे विसरण्याची समस्याही वाढते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.