Bael juice Benefits : उन्हाळ्यात अंगाची लाहीलाही करणाऱ्या गरमीपासून सुटका मिळवण्यासाठी अनेकजण वेगवेगळ्या थंड पेयांचं सेवन करतात. यातील एक सर्वात फायद्याचा रस म्हणजे बेल फळाचा रस. बेलाच्या रसाचे उन्हाळ्यात अनेक फायदे होतात. बेलाचा वापर आरोग्य चांगलं ठेवण्यासोबतच तुमचं सौंदर्य चांगलं ठेवण्यासाठीही होऊ शकतो. आयुर्वेदातही बेलाचे गुण सांगण्यात आले आहेत.
बेल फळाचा रस तुमच्या आरोग्यासाठी फारच फायदेशीर आहे. उन्हाळ्यात दररोज बेल फळाचा रस घेतल्यास याचा फायदा तुम्हाला पुढील काही दिवसातच बघायला मिळेल. बेल फळात प्रोटीन, थायमीन, रायबोफ्लेविन आणि व्हिटॅमिन सी सारखे आणखीही काही पोषक तत्वे आढळतात.
गॅस आणि पोटदुखीपासून आराम
बदलत्या जीवनशैलीमुळे आणि ऑफिसमध्ये तासनतास बसून राहिल्याने गॅस, पोटदुखी यांसारख्या समस्या होणं ही सामान्य बाब झाली आहे. खासकरुन कमी वयाच्या लोकांना याचा जास्त त्रास होऊ लागला आहे. तुम्हालाही ही समस्या असेल तर दररोज बेलाच्या फळाचा रस घ्यावा. याने तुम्हाला होणारा त्रास कमी होईल.
कोलेस्ट्रॉल करा कंट्रोल
जर तुम्हाला किंवा तुमच्या परिवारातील कुणाला कोलेस्ट्रॉलची समस्या असेल तर बेलाच्या रसाने तुम्हाला आराम मिळेल. बेल फळाच्या रसाने कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत मिळते. यामुळे ब्लड शुगरही कंट्रोल होतं.
हृदयाचे आजार असलेल्यांसाठी फायद्याचा
हृदयाच्या वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांसाठी बेल फळाचा रस सेवन करणे रामबाण उपाय आहे. यासाठी बेलाच्या रसात एक चमचा तूप मिश्रित करुन रोज घ्या. याने तुम्हाला आराम मिळेल.
डिहायड्रेशन-अॅसिडिटीपासून आराम
डिहायड्रेशनची समस्या असलेल्यांसाठी बेलाचा रस फारच उपयुक्त मानला जातो. यात तुम्ही गूळ किंवा साखर मिश्रित करुन सेवन करु शकता. जर तुम्हाला अॅसिडिटीची समस्या असेल तर याने तुम्हाला लगेच आराम मिळेल.
तोंडाच्या फोडांपासून आराम
तोंडाला फोडं येण्याची वेगवेगळी कारणे आहेत. त्यातील एक महत्वाचं कारण म्हणजे पोट बिघडणे हे आहे. जर तुम्हाला तोंडात फोडं आले असतील तर बेलाचा रस सेवन करा. याने पोटाची समस्या दूर होईल आणि तुमच्या तोंडात आलेल्या फोडांचा त्रासही कमी होईल. कारण हा रस प्यायल्याने शरीर थंड होतं.
रक्त शुद्ध करण्यास मदत
रक्त साफ नसल्याने तुम्हाला वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. यातून तुम्हाला सर्वात जास्त स्कीनच्या समस्या उद्भवतात. अशात बेलाचा रस आणि त्यात दोन थेंब मध मिश्रित करुन घ्यावे. याने तुम्हाला आराम मिळेल.