Benefits of bay leaf : मसाल्याच्या पदार्थांमध्ये असलेल्या तेजपत्त्याचा उपयोग भारतीय व्यंजनांमध्ये सुगंध आणि चवीसाठी करण्यात येतो. एखाद्या पदार्थामध्ये तेजपत्ता घातल्यास त्याचा सुगंध वाढतोच शिवाय तो पदार्थ स्वादिष्टही होतो. परंतु याशिवाय तेजपत्ता आरोग्यासाठीही फायदेशीर असतो. त्यामध्ये अनेक औषधी गुणधर्म आढळून येतात. यामध्ये शरीरासाठी आवश्यक असणारी 81 पोषक तत्व आढळून येतात. यामध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशिअम, कॅल्शिअम, सेलेनिअम, प्रोटीन, व्हिटॅमिन आणि आयर्न यांसारखे अनेक फायदेशीर घटक आढळून येतात. याशिवाय यामध्ये भरपूर प्रमाणात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुण असतात. तसेच अँटीऑक्सीडेंटही भरपूर प्रमाणात असते. जाणून घेऊयात तेजपत्त्याचे आरोग्यासाठी होणारे फायदे...
1) पचनक्रियेसाठी फायदेशीर
तेजपत्ता पचनक्रिया सुधारण्यासाठी फायदेशीर असतो. याचं सेवन केल्यानं अनेक प्रकारचे पचनासंबधीत आजार दूर होतात. जर तुम्हाला बध्दकोष्टाची किंवा अॅसिडिटीची समस्या असेल तर तेजपत्ता तुमच्यासाठी रामबाण उपाय आहे.
2) ब्लड प्रेशर नियंत्रित राहतं
मधुमेहावर तेजपत्त्याची पानं गुणकारी ठरतात. हे शरीरातील साखरेचं प्रमाण नियंत्रित ठेवतात. तसचे हृदयाचं आरोग्य राखण्यासाठीही फायदेशीर ठरतात. त्यामुळे मधुमेहानं ग्रस्त असलेले लोकांनी याचे सेवन करणं फायदेशीर ठरतं.
3) झोपेची समस्या दूर होते
बऱ्याचदा आपली झोप पूर्ण होत नाही अथवा आपल्याला झोपच येत नाही. यावर उपाय म्हणून तेजपत्त्याच्या पानांचा उपाय करावा. तेजपत्त्याच्या पानांच्या तेलाचे काही थेंब पाण्यात टाकून ते पाणी प्यायल्यानं शांत झोप लागते. तसेच खूप झोप येत असल्यास तेजपत्ता पाण्यात भिजत ठेवावा आणि सकाळी उठल्यानंतर ते पाणी प्यावं. असं केल्यानं डोळ्यांवरची झोप उडते आणि फ्रेश वाटतं.
4) किडनीची समस्या दूर होते
तेजपत्ता किडनीच्या समस्या दूर करण्यासाठी उपयोगी ठरतो. तेजपत्ता पाण्यात टाकून पाणी उकळा आणि पाणी प्या. तसेच शरीरातील विषारी घटक बाहेर काढून टाकण्यासाठी तेजपत्त्यामुळे फायदा होतो.
5) डोकदुखीवर गुणकारी
रोजची धावपळ आणि ताण यांमुळे अनेकदा डोकेदुखीसारख्या समस्या उद्भवतात. तेजपत्त्याच्या पानांचं तेल डोकेदुखी दूर करण्यासाठी रामबाण उपाय आहे. डोक्यावर या तेलानं मसाज केला तर आराम मिळतो.
6) कॅन्सरपासून बचाव
तेजपत्त्यामध्ये कॅन्सरपासून शरीराचा बचाव करण्यासाठीचे आवश्यक ते गुणधर्म असतात. यामध्ये कॅफीक अॅसिड, क्वेरसेटिन आणि इयूगिनेल यांसारखे घटक असतात. तेजपत्त्यातील हे घटक कॅन्सरला दूर ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.
7) हृदयाचे आरोग्य चांगलं राहतं
तेजपत्ता हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी मदत करतो. तेजपत्त्याचा आहारात समावेश केल्यानं हृदयविकाराचा धोका कमी होतो. तसेच हृदय निरोगी राहते.