Sleeping Early Benefits : आपल्या आरोग्यासाठी झोप किती महत्वाची आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. डॉक्टरही नेहमीच सल्ला देत असतात की, रात्री कमीत कमी ७ ते ८ तासांची झोप घेतली पाहिजे. कारण शरीर हे एका मशीनसारखं काम करत असतं. त्यामुळे शरीराला आरामाची गरज असते. पण अनेकजण आजकाल वेगवेगळ्या कारणांनी कमी झोपतात आणि सोबतच उशीरा झोपतात. जे आरोग्यासाठी फारच नुकसानकारक आहे. अशात आज आम्ही तुम्हाला लवकर झोपण्याचे काही जबरदस्त फायदे सांगणार आहोत. जे वाचून तुम्ही यापुढे रात्री लवकर झोपाल.
काय सांगतो रिसर्च?
यूरोपिअन हार्ट जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये लवकर झोपण्याचे फायदे सांगण्यात आले आहेत. या रिसर्चनुसार, रात्री १० ते ११ या वेळेत झोपल्याने वेगवेगळ्या हृदयरोगांचा आणि रक्ताभिसरण रोगांचा धोका कमी होतो. तुम्हाला जर ११ वाजतानंतर झोपण्याची सवय असेल तर तुम्हाला कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीजचा धोका जास्त वाढतो. त्यामुळे लवकर झोपल्याने तुम्ही जास्त काळ निरोगी रहाल आणि अनेक गंभीर आजारांचा धोका टाळू शकाल. अशात रात्री १० ते ११ वाजताच्या आत झोपल्याने काय काय फायदे होतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
रात्री लवकर झोपण्याचे फायदे
झोप पूर्ण होईल
तुम्ही जर १० वाजताच्या आत किंवा १० वाजता झोपलात तर तुम्हाला झोपण्यासाठी जास्त वेळ मिळतो. म्हणजे शरीराची ७ ते ८ तास झोपण्याची गरज लवकर झोपल्याने पूर्ण होते. ज्यामुळे सकाळी तुम्ही फ्रेश राहता आणि दिवसभराची कामेही चांगली होतात.
हृदयरोगांचा धोका कमी
जर तुम्ही लवकर झोपाल तर तुमची झोप पूर्ण होईल आणि शरीराला पुरेसा आराम मिळेल. अशात हाय ब्लड प्रेशर आणि इतरही गंभीर हृदयरोगांचा धोका कमी होतो. एका रिसर्चनुसार, नेहमीच झोप कमी घेतल्याने हृदयरोग, हायपरटेंशन आणि डायबिटीसचा धोका वाढतो.
शाळेत परफॉर्मन्स वाढतो
लहान मुले जर रात्री लवकर झोपले तर हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. झोपेत त्यांच्या शरीराच्या वेगवेगळ्या क्रिया योग्यपणे होतात. मेंदुचं आरोग्य चांगलं राहतं. ज्यामुळे ते सकाळी फ्रेश राहतात आणि शाळेत गेल्यावर परफॉर्मन्स चांगला देतात.
इम्यूनिटी वाढते
वेगवेगळ्या शोधांमधून समोर आलं आहे की, रात्री लवकर झोपल्याने झोप पूर्ण होते आणि याचा फायदा शरीराला मिळतो. लवकर झोपल्याने इम्यूनिटी बूस्ट करण्यास मदत मिळते. ज्यामुळे वेगवेगळ्या इन्फेक्शन आणि आजारांपासून बचाव होतो.