अमेरिकेतील शिकागो शहरात तरुणांना बेकायदेशीररित्या ई-सिगारेट विकण्याच्या प्रकरणात ८ ऑनलाईन विक्रेत्यांना कोर्टात खेचलं होतं. आता या घटनेच्या काही दिवसानंतर फेडरल एजन्सीजने देशभरातील तरुणांकडून ई-सिगारेटचा वापर फार जास्त प्रमाणात केला जातो, यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
अमेरिकी खाद्यपदार्थ आणि औषधी प्रशासन(एफडीए) आणि सेंटर फॉर डिजीज कंट्रोल अॅन्ड प्रिव्हेंशन(सीडीसी) व्दारे गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या २०१८ च्या राष्ट्रीय युवा तंबाखू सर्वेक्षणनुसार, अमेरिकेत मध्यम आणि हायस्कूलमधील साधारण ३६ लाख विद्यार्थी ई-सिगारेटचा वापर करत आहेत. यातील १५ लाख विद्यार्थी एका वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून ई-सिगारेटचा वापर करत आहेत.
सर्वेक्षणानुसार, २०१७ ते २०१८ पर्यंत हायस्कूलच्या विद्यार्थ्यांमध्ये ई-सिगारेटचा वापर धक्कादायरित्या ७८ टक्क्यांनी वाढला आहे. तर हेच प्रमाण मध्यम शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये ४८ टक्क्यांनी वाढलं आहे. ही वाढलेली आकडेवारी फार जास्त मानली जात आहे.
एफडीएचे आयुक्त स्कॉट गोटलिब एका पत्राव्दारे सांगितले की, तरुणांमध्ये ई-सिगारेटचा वापर हा 'माहामारी' प्रमाणे पसरत आहे. ते म्हणाले की, हे कोणत्याही परिस्थितीत रोखलं गेलं पाहिजे. मुलांच्या एका संपूर्ण पिढीला ई-सिगारेटच्या माध्यमातून निकोटीनची सवय लावण्याची परवानगी कोणत्याही परिस्थितीत देण्यात येऊ नये.
अमेरिकन एजन्सी ई-सिगारेटवर प्रतिबंध आणण्यासाठी वेगवेगळे पावले उचलण्याचा विचार करत आहेत. यात ही सिगारेट केवळ त्याच दुकानांवर विकली जाणार, जिथे ग्राहकांचं वय जाणून घेण्याची व्यवस्था असेल.