Amla juice : वेगवेगळ्या फळांचा ताजा ज्यूस पिणं आरोग्यासाठी किती फायदेशीर असतं हे सगळ्यांनाच माहीत असतं. ज्यूसमध्ये अनेक व्हिटॅमिन्स, मिनरल्स असतात. याने शरीराला एनर्जी मिळते. मात्र, अनेकांना हे माहीत नसतं की, रोज कोणत्या फळाचा ज्यूस पिणं जास्त फायदेशीर ठरतं. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आता काही दिवसांमध्ये थंडीला सुरूवात होईल. या दिवसांमध्ये बाजारात आवळे मिळतात. या दिवसांमध्ये सकाळी रिकाम्या पोटी आवळ्याचा ज्यूस प्यायल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळू शकतात. मात्र, आवळ्याचा ज्यूस रात्री पिणं टाळलं पाहिजे. कारण आवळा थंड असतो. अशात आवळा थंड असूनही हिवाळ्यात याच्या ज्यूसचं सेवन कसं करावं, हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
आवळा ज्यूसची रेसिपी
२ ते ३ आवळे कापून घ्या. त्यातील बीया वेगळा काढा. अर्धा ते एक ग्लास पाण्यासोबत त्यांना ब्लेंड करा. जेव्हा हे मिश्रण चांगलं मिक्स होईल, तेव्हा ते गाळून घ्या. यात थोडं काळी मिरे पावडर टाका. थोडं मध टाका.
हाडे मजबूत होतील
आवळ्यामध्ये वेगवेगळे व्हिटॅमिन्स भरपूर असतात. यात कॅल्शिअमही भरपूर असतं. सायन्स डायरेक्टनुसार, आवळ्याचा ज्यूस ऑस्टियोपोरोसिस आजारावर प्रभावी उपाय आहे. या आजारात हाडे कमजोर होतात आणि हाडे मोडण्याचा धोका असतो.
तरूण दिसाल
वय वाढल्यावर त्वचेमधील कोलेजन कमी होतं. यामुळे त्वचेवर सुरकुत्या, डाग, ड्रायनेस, डार्क सर्कल आणि त्वचा निर्जीव होते. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं जे कोलेजनचं उत्पादन वाढवतं. यामुळे त्वचा तरूण दिसते आणि तुमचं वयही कमी दिसतं.
हृदयासाठी फायदेशीर
आवळ्याचा ज्यूस हृदयरोगांपासून बचाव करण्यासाठी फार फायदेशीर असतो. काही रिसर्चनुसार, याचं सेवन केल्याने एथेरोजेनिक इंडेक्स कमी होतो. हा इंडेक्स कोलेस्ट्रॉल जमा होण्याच्या शक्यतेबाबत सांगतो. कोलेस्ट्रॉल जमा झाल्याने नसा डॅमेज होतात.
इम्यूनिटी वाढते
आवळ्याच्या ज्यूसमध्ये असलेलं व्हिटॅमिन सी अॅंटी-ऑक्सिडेंटसारखं काम करतं. याने फ्री रॅडिकल्स, अॅंटी-इन्फ्लेमेटरी आणि अॅंटी-मायक्रोबिअल तत्व वाढतात. ज्यामुळे इम्यून सिस्टीमचा प्रभाव वाढतो. तुमचा अनेक आजारांपासून बचाव होतो.