डॉ. आरती अढे, स्त्रीरोगतज्ज्ञ, (शब्दांकन : ऋषिराज तायडे)
पुरुषांसाठी गर्भनिरोधक म्हणून आतापर्यंत केवळ कंडोम हाच एकमेव पर्याय होता; परंतु आता कंडोमचा वापर न करताही गर्भधारणा होण्याची भीती राहणार नाही. कारण भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) गर्भधारणा रोखणाऱ्या खास पुरुषांसाठीच्या इंजेक्शनचा शोध लावला आहे. विशेष म्हणजे, कोणतेही साइड इफेक्ट्स नसलेले इंजेक्शन लोकसंख्या नियंत्रणासाठी क्रांतिकारी संशोधन ठरणार आहे.
हे इंजेक्शन रिगस (RISUG - रिव्हर्सिबल इनहिबिशन ऑफ स्पर्म अंडर गाइडन्स) म्हणून ओळखले जाते. ६० मिलिग्रॅमचे हे इंजेक्शन अंडकोषाजवळील दोन्ही शुक्राणू नलिकेमध्ये दिले जाते. तत्पूर्वी संबंधित व्यक्तीला भूल दिली जाते. या इंजेक्शनमधून स्टायरिन मेलिक इनहायड्राइड (एसएमए) हे पॉलिमर घटक नलिकेत सोडल्यावर ते शुक्राणू नलिकेच्या भिंतीला चिकटून राहतो. ज्यावेळी मानवी वीर्य अंडकोषातून शुक्राणू नलिकेच्या माध्यमातून पुढे जातात, तेव्हा पॉलिमर घटक वीर्यातील पॉझिटिव्ह चार्ज्ड शुक्राणू हे पॉलिमरला चिकटतात, तर निगेटिव्ह चार्ज्ड शुक्राणू नष्ट होतात. त्यामुळे शुक्राणूंविना असलेल्या वीर्यामुळे गर्भधारणेचा धोका संभवत नाही.
कशी झाली चाचणी?
- आयसीएमआरने या इंजेक्शनसाठी सात वर्षे २४ ते ४० वयाच्या ३०३ विवाहित पुरुषांवर संशोधन केले. - इंजेक्शन दिल्यावर गर्भधारणा रोखण्याची शक्यता सुमारे ९९.०२%, तर वीर्यातील शुक्राणूंची अनुपस्थिती ९७.३% असल्याचे दिसून आले. - संशोधनावेळी इंजेक्शनमुळे या पुरुषांच्या पत्नींच्या आरोग्यावर काही परिणाम होतो का, यावरही देखरेख ठेवण्यात आली.
दुष्परिणाम काय?
महिलांनी गर्भनिरोधक गोळ्या घेतल्यावर त्यांना पीसीओडी, वजन वाढणे असे अनेक हार्मोनल त्रास संभवतात; परंतु, या इंजेक्शनमुळे पुरुषांना कोणताही त्रास होत नसल्याचे संशोधनात म्हटले आहे. इंजेक्शन दिल्यावर किरकोळ वेदना आणि सूज येऊ शकते; परंतु, तीही अगदी काही वेळ असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. हे इंजेक्शन उपलब्ध झाल्यावर कोणत्याही दवाखान्यात सहज आणि अगदी कमी वेळेत देता येते.
लोकसंख्या नियंत्रणासाठी महत्त्वपूर्ण
अनेक देश वाढत्या लोकसंख्येमुळे चिंतित आहे. त्यासाठी जनजागृतीही केली जात आहेत. अशातच पुरुषांसाठी गर्भनिरोधक इंजेक्शन आल्याने ते लोकसंख्या नियंत्रणाच्या मोहिमेत मोठा हातभार लावू शकते. आता प्रतीक्षा आहे ती या इंजेक्शनची बाजारात येण्याची आणि परवडणाऱ्या दरात सहज उपलब्ध होण्याची.