संतोष आंधळे, विशेष प्रतिनिधी, मुंबई
आपल्याकडे सध्या डॉक्टरांचा सल्ला न घेता स्वतःहून औषध घेण्याचे प्रमाण वाढीस लागल्याचे चित्र दिसत आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून संपूर्ण देशात इन्फ्लुएंझा ए चा उपप्रकार एच ३ एन २ हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात खोकला आणि काही प्रमाणात तापाचे रुग्ण पाहायला मिळत आहे. मात्र, नागरिक या आजारावरील उपचारासाठी सर्रासपणे अँटिबायोटिक्स (प्रतिजैविके) औषधे घेत आहेत. या सगळ्या प्रकारांमुळे नजीकच्या भविष्यात ही प्रतिजैविके निष्क्रिय होऊन त्यांची मात्राच लागू पडणार नाही, अशी भीती वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
१९२८ मध्ये शास्त्रज्ञ सर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी सर्वप्रथम अँटिबायोटिक औषधाचा शोध लावला. त्याला पेनिसिलीन हे नाव देण्यात आले. त्यानंतर बरेच संशोधन होऊन नवनवीन औषधे बाजारात आली. मात्र, गेल्या काही वर्षांत या औषधांचा अतिरेकी वापर होऊ लागला आहे. काही महिन्यांपूर्वीच लॅन्सेट या नियतकालिकाने या विषयावर शोधनिबंध प्रसिद्ध केला. त्यात अँटिबायोटिक औषधांचे सेवन करण्याच्या भारतीयांच्या सवयीवर बोट ठेवण्यात आले. त्यांनी २०१९ मध्ये भारतातील प्रतिजैविके औषध सेवनाचा अभ्यास केला. या औषधांबाबत विश्वात धोकादायक परिस्थिती निर्माण होऊ शकते, असे मत व्यक्त केले होते.
भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनेसुद्धा यापूर्वी विषाणूमुळे निर्माण होणारा कमी तीव्रतेचा ताप आणि खोकला यासाठी अँटिबायोटिक घेऊ नये, अशी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मात्र, तरीसुद्धा मोठ्या प्रमाणात अँटिबायोटिकचा बिनदिक्कतपणे केला जात आहे. विशेष म्हणजे डॉक्टरांकडून एकदा का एखाद्या आजारावरील औषधाचे नाव कळाले की ती औषधे डॉक्टरकडे न जाता स्वतःहून घेण्याचा मोठा प्रघात भारतात पाहायला मिळत आहे. दोन-तीन महिन्यांपासून संपूर्ण देशात खोकला आणि काही प्रमाणात तापाचे रुग्ण पाहायला मिळत आहे. यावर उपचार म्हणून नागरिक मेडिकलमधून अँटिबायोटिकसारखी औषधे प्रिस्क्रीप्शनशिवाय नसताना विकत घेऊन त्याचे सेवन करत आहेत. डॉक्टरांच्या चिट्ठीशिवाय अशी औषधे देऊ नये असे नियम असताना ते नियम धाब्यावर बसविले जातात. त्यावर कडक कारवाई केली जाते, असे अनेक वेळा सांगितले जाते.अँटिबायोटिक्स हे जिवाणू संसर्ग झाला तर त्यासाठीच योग्य आहे. विषाणू संसर्गाला या औषधांचा काही फायदा होत नाही. ही औषधे डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय देऊ नये असे अपेक्षित असताना आपल्याकडे मेडिकलमध्ये मागेल त्याला ते दिले जाते. खोकला हा विषाणूमुळे होणार आजार आहे. नागरिक स्वतःहून अझिथ्रोमायसिनसारखी अँटिबायोटिक्स औषधे घेत आहेत. आपल्या शरीरात काही चांगले जिवाणू असतात. गरज नसताना आपण जर अँटिबायोटिक्स घेतले तर ते या चांगल्या जीवाणूंना धोका पोहोचवतात. त्याचा परिणाम आपली प्रतिकारशक्ती कमी होते. अँटिबायोटिक्सच्या औषधांची मात्र आणि डोसेस ठरलेले असतात. ते त्या दिवसापुरते घेणे अपेक्षित असते. एखाद दोन गोळ्या खाऊन बरे वाटले तरी तो कोर्स पूर्ण होईपर्यंत करायचा असतो. अन्यथा त्या औषधांना सूक्ष्मजीव विरोधी प्रतिकार निर्माण होतो. अशा घटना वाढत आहेत. त्यामुळे या औषधांचा अतिरेक थांबविण्याची गरज आहे. आम्ही केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सर्व महासंचालकांना पत्र लिहून ही औषधे प्रिस्क्रीप्शनशिवाय देऊ नये, असे कळविले आहे. डॉ. नरेंद्र सैनी, अध्यक्ष, इंडियन मेडिकल असोसिएशन, स्टँडिंग कमिटी अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स
अँटिबायोटिक डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय देऊ नये असा नियम आहे. आमचा नियमितपणे यासंदर्भात मोहीम सुरू असते. जर कुठल्या मेडिकलबद्दल नेमकी तक्रार आली, तर त्यावर आम्ही कडक कारवाई करतो. - अभिमन्यू काळे, आयुक्त, अन्न-औषध प्रशासन
तीव्र खोकला, सर्दी, तास यांचा संसर्ग वाढल्यामुळे फेब्रुवारीत औषधांच्या विक्रीत २०-२५ टक्के वाढ झाली आहे. आम्ही पॅरासिटामॉल, अजिथ्रोमाइसिन आणि खोकला सिरप यांसारख्या औषधांच्या विक्रीत लक्षणीय वाढ पाहत आहोत. - राजीव सिंघल, सरचिटणीस, अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना
अँटीबायोटिक औषधे देण्याबाबत मार्गदर्शक तत्त्वे घालून देण्यात आली आहेत. त्यानुसारच ती औषधे घेणे अपेक्षित असते. गेल्या ३० वर्षांत प्रतिजैविके औषधावर फारसे संशोधन झालेले नाही. सध्या जीवनशैलीवर. आजारांवर, औषधांवर मोठ्या प्रमाणात संशोधन होत आहे. ही औषधे एका ठराविक दिवसांकरिता घेणे अपेक्षित आहे. मात्र, आपल्याकडे काही रुग्ण अतिप्रमाणात या गोळ्या घेतात. त्यामुळे प्रतिजैविक औषधे निष्क्रिय ठरण्याचा धोका म्हणजेच अँटीबायोटिक रेझिस्टन्स वाढण्याची शक्यता अधिक आहे. - डॉ. अविनाश सुपे, माजी अधिष्ठाता, केईएम रुग्णालय.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"