अँटीबायोटिक्स रेजिस्टेंसमुळे २०५० पर्यंत जगातील जवळपास ४ कोटी लोकांचा मृत्यू होऊ शकतो. लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झालेल्या एका नव्या अभ्यासात हा धक्कादायक खुलासा झाला आहे. रिसर्चनुसार, २०२२ ते २०५० पर्यंत अँटीमायक्रोबियल रेजिस्टेंसमुळे होणाऱ्या मृत्यूचा आकडा ७० टक्क्यांनी वाढू शकतो. चिंताजनक बाब २०५० पर्यंत अँटीमायक्रोबियल रेजिस्टेंसमुळे १.१८ कोटी मृत्यू फक्त दक्षिण आशियामध्येच होतील, ज्यामध्ये भारत, पाकिस्तान, बांगलादेश, भूतान, मालदीव, नेपाळ आणि श्रीलंका यांचा समावेश आहे. तर आफ्रिकेत मृतांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढेल.
अँटीबायोटिक रेजिस्टेंसमुळे मृत्यूचा धोका का?
संशोधकांचं म्हणणं आहे की, आज अँटिबायोटिक्सचा वापर जास्त आणि चुकीच्या पद्धतीने केला जात आहे. त्यामुळे बॅक्टेरियावर अधिक दबाव येतो आणि कालांतराने बॅक्टेरिया अधिक रेजिस्टेंट बनत आहेत. हे टाळायचे असेल तर अँटीबायोटिक्सचा वापर हुशारीने आणि योग्य पद्धतीने केला पाहिजे.
धडकी भरवणारा रिसर्च
हा अभ्यास ग्लोबल रिसर्च ऑन अँटीमायक्रोबियल रेजिस्टेंस प्रोजेक्टचा पार्ट आहे आणि जगभरातील अशा प्रकारचा हा पहिला अभ्यास आहे. डब्ल्यूएचओ म्हणते की, हा रेजिस्टेंस कॉमन इन्फेक्शनवर उपचार करताना त्रासदायक ठरतो. केमोथेरपी आणि सिझेरियन सारखं मेडिकल इंटरवेन्शन खूप रिस्की बनवतं. २०४ देशातील ५२ कोटींहून अधिक हॉस्पिटल रेकॉर्ड, इन्श्योरन्स क्लेम्स आणि डेथ सर्टिफिकेट्स यासारख्या डेटाचा अभ्यासात समावेश करण्यात आला आहे. यासाठी स्टॅटिस्टिकल मॉडेलिंगचा वापर करण्यात आला आहे.
अभ्यासातून काय समोर आलं?
या अभ्यासात असं आढळून आलं आहे की, १९९० ते २०२१ दरम्यान, दरवर्षी १० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, ज्याचं प्रमाण भविष्यात आणखी वाढू शकतं. अभ्यासाचे प्रमुख लेखक केविन इकुटा म्हणतात की, ३.९० कोटी मृत्यू होऊ शकतात. यानुसार, दर मिनिटाला ३ मृत्यू होतील.
मुलांना कमी, वृद्धांना सर्वाधिक धोका
संशोधकांचा असा अंदाज आहे की, मुलांमध्ये एंटीमाइक्रोबियल रजिस्टेंसमुळे होणारे मृत्यू वर्षानुवर्षे कमी होत राहतील. २०५० पर्यंत निम्मे होतील, तर वृद्धांमधील मृत्यूची संख्या त्याच कालावधीत दुप्पट होऊ शकते. गेल्या ३० वर्षांचा पॅटर्न हेच सांगतो.