बंगळुरू: देशात आलेली कोरोनाची दुसरी लाट हळूहळू ओसरत आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोरोनानं हाहाकार माजवला. दर दिवशी देशात चार लाखाहून अधिक रुग्ण आढळून येत होते. आता मात्र हाच आकडा ४० हजारांच्या खाली आहे. त्यातच लसीकरणदेखील सुरू असल्यानं आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. मात्र तरीही नव्या व्हेरिएंटमुळे तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. याच पार्श्वभूमीवर कोविशील्ड लसीबद्दल 'पॉझिटिव्ह' बातमी समोर आली आहे.
कोरोना लसीकरण अभियानात सर्वाधिक वापर कोविशील्ड लसीचा केला जात आहे. सीरम निर्मित कोविशील्डची लस देशभरात कोट्यवधी लोकांनी घेतली आहे. कोविशील्डचे दोन डोस घेतल्यानंतर अँटिबॉडीज किती काळ शरीरात राहतात, हे तपासण्यासाठी बंगळुरूतील श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्सेस अँड रिसर्चनं एक अभ्यास हाती घेतला. त्यातून समोर आलेले निष्कर्ष अतिशय दिलासादायक आहेत. कोविशील्डचे दोन्ही डोस घेतल्याच्या ६ महिन्यांनंतरही ९९ टक्के व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडी टिकून असल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली.कोरोना लसीचा धसका! लसीकरणासाठी नर्स घरी येताच महिला घरातून पळाली अन्...; Video व्हायरल
लसीकरण पूर्ण झालेल्या २५० आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शरीरातील अँटिबॉडीज तपासण्यासाठी आम्ही सर्वेक्षणात केलं, अशी माहिती जयदेवचे संचालक डॉ. सी. एन. मंजुनाथ यांनी दिली. 'आम्ही २५० जणांच्या शरीरातील अँटिबॉडीज तपासून पाहिल्या. दोन्ही डोस घेऊन ६ महिने पूर्ण झाल्यानंतरही ९९ टक्के व्यक्तींच्या शरीरात अँटिबॉडीज कायम असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली. त्यामुळे आताच्या घडीला तरी बूस्टर डोसची गरज नाही असं आपण आता म्हणून शकतो,' असं मंजुनाथ म्हणाले.
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २५० आरोग्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारीत कोविशील्डचा दुसरा डोस देण्यात आला होता. एप्रिलमध्ये त्यांचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यावेळी ७९ टक्के व्यक्तींच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीनं सकारात्मक प्रतिसाद दिला. तर उर्वरित २१ टक्के व्यक्तींच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीनं नकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र सप्टेंबरमध्ये तब्बल ९९ टक्के व्यक्तींच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीनं सकारात्मक प्रतिसाद दिला.