- सुदाम कुंभार, निवृत्त प्राचार्य तथा समुपदेशक तंत्रज्ञान बदललं, जीवनशैली बदलली... परिणामी अगदी छोट्या छोट्या मुलांच्याही हातात मोबाइल आले. हे मोबाइल अर्थात स्मार्ट फोन स्मार्ट पिढीचा अविभाज्य भागच बनले. पण मोबाइलचा अतिवापर मुलांच्या मानसिकतेवर किती परिणाम करतो? याचा विचार करणे गरजेचे आहे.
कोरोनामुळे मार्च २०२० मध्ये शाळा बंद झाल्या. त्यावेळी ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय समोर आला. मुलांच्या हाती मोबाइल देणे ही पालकांची अनिवार्यता बनली. मुलांच्या हातात सतत मोबाइल दिसू लागला. आता पुन्हा ऑफलाइन वर्ग सुरू झाले. पण, मुलांचे मोबाइल वेड काही कमी झालेले नाही.
उपाय काय? मध्यंतरी महाराष्ट्रातील काही गावांमध्ये विशिष्ट वेळेमध्ये मोबाइल वापरण्यास बंदी घातल्याच्या बातम्या वाचल्या. हा उपाय म्हणून चांगला असला तरी सक्तीपेक्षा स्वतःवर घातलेले निर्बंध महत्त्वाचे वाटतात. यात पालक, शिक्षकांची भूमिकाही महत्त्वाची आहे.
घोळक्यांना आवरायचे कसे?मुलांमधील मोबाइल वेडाचे परिणाम आता हळूहळू बाहेर रस्त्यावरही दिसू लागले आहेत. शाळा-महाविद्यालयांच्या प्रवेशद्वाराजवळ किंवा परिसरात मुलामुलींचे घोळके दिसून येतात. त्यातील मुलांचे वर्तन पाहता अनेक प्रश्न पडतात.
नजरेस पडतात या गोष्टी... पालक व विद्यार्थ्यांसमोर स्वतःचे वा स्वतःबरोबर आलेल्या मित्रांचे फोटो काढणे.इतर विद्यार्थ्यांचे लक्ष स्वतःकडे वेधणे. मुलींना ‘हाय.. हॅलो...’ असा आवाज देणे. बाइकवर बसून राहणे, बाइकचा हॉर्न वाजवित राहणे, मुलींना बाइकवर बसण्याचा आग्रह, इत्यादी. सर्रासपणे अपशब्दांचा वापर करणे.
शाळांची जबाबदारी काय?शालेय प्रशासनसुद्धा पालकांच्या तक्रारी येत नाहीत तोपर्यंत कारवाई करत नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पालक सभांमध्ये यावर ठोस उपाययोजना करणे अनिवार्य आहे. शाळेबाहेरील अनावश्यक जमावाला निर्बंध घालणे ही शाळा तथा महाविद्यालयांची जबाबदारी आहे.
शाळा हे करू शकतात स्वतःच्या किंवा मित्राच्या बाइकवरून फिरणारे किंवा शाळा-महाविद्यालयाच्या भोवती घोळक्याने उभे राहणारे विद्यार्थी वारंवार दिसत असतील तर त्यांच्या पालकांना याबाबत माहिती द्यावी. शाळेच्या परिसरात विनाकारण जमाव होणार नाही यासाठी स्थानिक पोलिसांचे साहाय्य घ्यावे. माजी विद्यार्थी संघ शाळेशी संलग्न असल्यास त्यांचे सहकार्य घ्यावे.