- नेहा चढ्ढाज्या गरोदर माता मोबाईलचा कमीत कमी वापर करतात त्यांच्या तुलनेत सतत मोबाईललाच चिकटलेल्या गरोदर मातांची मूलं जास्त हायपर अॅक्टिव्ह असतात असा एक अभ्यास नुकताच समोर आला आहे. मोबाईलमधल्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे मूलं हायपर अॅक्टिव्ह होवू शकतात असं एक निरीक्षण समोर येतं आहे. प्रख्यात लेखिका लॉरा बिर्क्स यांनी आणि त्यांच्या टीमने विश्लेषण केलेल्या आकडेवारीनुसार मोबाईलचा अती वापर करणाऱ्या मातांची मूलं हायपर अॅक्टिव्ह असलेली आढळलेली आहेत.बार्सिलोना इन्स्टिट्यूट फॉर ग्लोब हेल्थ यांच्यावतीने लॉरा आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ८० हजार मातांचं एक सर्व्हेक्षण केलं. डेन्मार्क, स्पेन, नॉर्वे, नेदरलॅण्डस आणि कोरिया या देशातल्या मातांचा आणि मुलांचा हा अभ्यास. त्यात त्यांना असं आढळलं की गरोदरपणात ज्या माता मोबाइलवर जास्त वेळ बोलत होत्या त्या मातांच्या मुलांना आता वर्तन समस्या अधिक आहेत. नुस्त्या वर्तन समस्याच नाही तर भावनिक समस्याही अधिक दिसून आल्याचे हा अभ्यास म्हणतो.
१९९६ ते २०११ दरम्यान गरोदर असलेल्या मातांचं आणि त्यांच्या मुलांचं दरम्यान हे सर्व्हेक्षण झालं. ज्या मातांनी मोबाईल वापरलाच नाही किंवा अगदी कमी वापरला त्यांची मुलं तुलनेनं शांत आणि भावनिक दृष्ट्याही स्थिर होती. मात्र ज्या माता मोबाईलवर अधिक बोलत त्यांची मुलं जास्त अस्वस्थ, तडतडी, आणि चिडचिडी दिसली.
आता याचा मोबाईल वापराशीच थेट संंबंध असेल का ? तर त्याचा एक संबंध म्हणजे त्यातून पालक म्हणून तुमचा स्वभाव कळतो. तुम्ही कशाला महत्व देता हे कळतं. तुमचा पोटातल्या बाळाशी संवाद किती हे कळतं. आणि मूल झाल्यानंतरही पालक म्हणून वर्तन, मुलांकडे लक्ष यासाऱ्याशी त्याचा संबंध आहे. गरोदर मातांनी मोबाईल वापरुच नये असा या अभ्यासाचा सल्ला नाही मात्र, मूलावर त्याचा परिणाम होतो याकडे हा अभ्यास लक्ष वेधतो आहे.