तुम्ही सतत फोनवर असता का? समजा तुमचा फोन तुमच्या हातात नसला तर तुम्हाला बैचेन वाटतं का? मित्रपरिवार किंवा कुटुंबियांशी बोलताना तुम्ही सतत फोन चेक करत राहता का? ऑफिसच्या महत्वाच्या मीटींगमध्ये तुम्हाला सतत फोन पाहत राहण्याची गरज भासते का? असे असेल तर तुम्ही फबिंग ने त्रस्त असण्याची शक्यता असेल. फबिंग म्हणजे नेमके काय? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर आमच्याकडे त्याचे उत्तर आहे. आम्ही ते तुम्हाला समजावणार आहोत. हे समजताना तुमच्या लक्षात येईल की तुम्ही किती फोन अॅडिक्ट आहात.
फबिंग म्हणजे काय?फोन (phone)आणि स्नबिंग (snubbing)या दोन शब्दांपासून फबिंग हा शब्द तयार झाला आहे. स्नबिंग म्हणजे एखाद्याकडे हेतूपूर्वक दुर्लक्ष करणे. तुम्ही एखाद्या संभाषणात कारण नसताना सतत फोन चेक करत असाल तर त्याला फबिंग म्हणता येऊ शकते. मात्र यामुळे तुमच्या सोशल लाईफवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. एका संशोधनानुसार ३२ टक्के लोक दिवसातून इतर लोकांसोबत असताना फबिंग करतात.
याची लक्षणं कोणकोणती?
- कुटुंबासमवेत किंवा मित्रपरिवारासोबत जेवताना सतत स्मार्टफोन चेक करत राहणे.
- मित्रांसोबत किंवा इतरही कोणत्या व्यक्तीसोबत संभाषण करताना लक्ष सतत स्मार्टफोनकडे असणे.
- एखाद्या महत्त्वाच्या मीटींगमध्ये फोनकडे सतत पाहत राहणे.
- प्रत्येक ठिकाणी स्वत:सोबत स्मार्टफोन ठेवणे.
- रात्री झोपतानाही सतत स्मार्टफोनवर असणे.
याचे परिणामनाते संबधांमध्ये दुरावाआपण फबिंग करत असताना समोरच्या व्यक्तीला कमी महत्त्व देतो त्यामुळे नातेसंबंधांमध्ये कडवटपणा येतो. आपण समोरासमोर केल्या जाणाऱ्या संभाषणापेक्षा वर्च्युअल संभाषणांमध्ये अधिक रस घेतो. याचा आपल्या समाजातील प्रतिमेवरही परिणाम होऊ शकतो. आपल्या कुटुंबियांना जवळच्यांना आपण कमी वेळ देतो त्यामुळे नात्यात दुरावा निर्माण होतो. फबिंग करताना व्यक्ती आपल्या सामाजिक प्रतिमेपेक्षा वर्च्युअल प्रतिमेला जास्त महत्व देतो. याचे दुष्परीणाम भविष्यात भोगावे लागू शकतात.
मानसिक समस्याफबिंगमुळे आपला नात्यांसंबंधीचा दृष्टीकोण नकारात्मक होऊ लागतो. जवळची नाती दूर गेल्याने आपल्याला एकटेपणा जाणवू लागतो. फबिंगमुळे चिंता, डिप्रेशन, झोप न येणे अशा मानसिक समस्या सतावू लागतात.
उपाय
- आपल्या स्मार्टफोनचा वापर कमी करण्याचा प्रयत्न करणे.
- सतत स्मार्टफोन न वापरता त्याचा कालावधी निश्चित करणे.
- इतरांसोबत असताना स्मार्टफोन जास्तीत जास्त लांब कसा राहिल याची काळजी घेणे
- संभाषणांदरम्यान स्मार्टफोनकडे लक्ष न देणे
- कुटुंबासमवेत जेवताना स्मार्टफोन दूर ठेवून जेवताना जेवणासंबंधीत, एखाद्या सकारात्मक विषयावर किंवा जेवणाबाबत गप्पा मारणे.