- माधुरी पेठकरजीवनशैलीतले बदल आता आपल्या छोट्या मोठ्या सवयींमध्ये डोकावू लागले आहेत. कधी कधी गोष्टी छोट्या असतात पण त्याचे पुढे गंभीर परिणाम होवू शकतात. पूर्वी रात्रीच्या जेवणानंतर किंवा सण समारंभानंतर उरलेलं अन्न स्टीलच्या वाटीत, भांड्यात काढून फ्रीजमध्ये ठेवलं जायचं आणि लवकरात लवकर संपवलं जायचं. पण आता फ्रीजमध्ये स्टीलच्या भांडींचा पसारा चांगला दिसत नाही म्हणून उरलेलं अन्न प्लॅस्टिकच्या छोट्या मोठ्या डब्यात ठेवलं जातं. आता हे प्लॅस्टिक कंटेनर वेगवेगळ्या रंगात मिळतात शिवाय ते पारदर्शक असतात म्हणजे त्यात ठेवललं अन्न दिसू शकतं. अशा कंटेनरमध्ये उरलेलं अन्न साठवण्याची सवय वाढू लागली आहे. आत हे कंटेनर फ्रीजमध्ये ठेवायला सोयीचे असतात शिवाय फ्रीजच्या सौंदर्याला शोभूनही दिसतात. हे सर्व ठीक आहे. पण या झाल्या बाह्य गोष्टी. पण आतल्या बाबींविषयी काय?
छान दिसणा-या प्लॅस्टिक कंटेनरमध्ये ठेवलेलं अन्न चांगलं राहातं, टिकून राहातं हा आपला गैरसमज झाला. इतकंच कशाला पाणी ठेवण्यासाठी प्लॅस्टिक बॉटल्स, शाळेत आॅफिसमध्ये टिफीनसाठीही प्लॅस्टिकचे डबे सर्रास वापरले जातात. प्लॅस्टिकचे डबे, कंटेनर, बॉटल वापरण्यात सोय नक्कीच आहे, आता तर ते वापरणा-याना त्यात स्टाइल आणि सौंदर्यही गवसलंय. पण सोयी आणि सौंदर्यामागे काही गंभीर परिणामही दडले आहेत याची जाणीव आहे का आपल्याला?
याचा अर्थ सर्वच प्लॅस्टिकचे कंटेनर वाईट असतात असं नव्हे. प्लॅस्टिक कंटेनरच्या क्वॉलिटीनुसार त्याचे फायदे तोटे ठरत असतात. ज्या प्लॅस्टिक कंटेनरच्यातळाशी #3 किंवा # 7 लिहिलेलं असतं असे प्लॅस्टिक कंटेनर मधून बीसफेनॉल ए किंवा फटालेटस नावाचे रसायन अन्नात मिसळण्याची शक्यता असते. याचा गंभीर परिणाम रक्तप्रवाहावर आणि संप्रेरकांच्या अर्थात हार्मोंन्सच्या संतुलनावर होतो.
ज्या प्लॅस्टिक कंटेनरच्या तळाशी #2 , #4 आणि #5 असे नंबर लिहिलेले असतात ते प्लॅस्टिक कंटेनर आरोग्यासाठी सुरक्षित असतात. जे प्लॅस्टिक कंटेनर बीपीए फ्री असतात ते वापरायला सुरक्षित असतात. पातळ प्लॅस्टिकच्या मिनरल वॉटर या परत कधीही वापरू नये. शिवाय त्यात पाणी भरून त्या बॉटल उन्हात कधीही ठेवू नये.
प्लॅस्टिक कंटेनर घेताना त्याची किंमत पाहून न घेता त्याची गुणवत्ता पाहून घेतले तर ते आरोग्यास अपायकारक ठरत नाही. तसेच प्लॅस्टिक कंटेनर वापरताना काळजी घेतली तर प्लॅस्टिकपासूनच्या अपायापासून आपण नक्कीच वाचू शकतो. मायक्रोवेव सेफ कंटेनर म्हटले की ते तापवले तरी चालतात असं समजलं जातं. पण प्लॅस्टिक कंटेनरमध्ये कधीही अन्न पुन्हा गरम करू नये. कारण प्लॅस्टिक कंटेनरमध्ये अन्न गरम केलं तर प्लॅस्टिकमधले रसायन अन्नामध्ये मिसळण्याची शक्यता असते. आणि असं झालं ते अन्नातले अनुवांशिक अन्नघटक बदलून टाकतात. असं अन्न शरीरास अपायकारक ठरतं. प्लॅस्टिक कंटेनरमध्ये गरम आणि पातळ अन्नपदार्थ ठेवण्यापेक्षा थंड आणि कोरडे पदार्थ ठेवावेत.
गरम पाण्यामुळे डाग , वास आणि चिकटपणा निघून जातो म्हणून अनेकदा भांडी धुतांना गरम पाण्याचा वापर केला जातो. पण प्लॅस्टिकचे कंटेनर आणि बाटल्या धुताना कधीही गरम पाण्याचा उपयोग करू नये. गरम पाण्यामुळे प्लॅस्टिकमधले रसायनं बाहेर पडून अन्नपदार्थात अथवा पाण्यात मिसळून अपाय करू शकतात.