फ्रिज आपल्या दैनंदिन जीवनातील एक महत्त्वाचं उपकरण आहे, त्याशिवाय घर अपूर्ण वाटतं. भाजीपाला व खाद्यपदार्थ ठेवण्यासाठी फ्रिजचा वापर हा हमखास केला जातो. भारतातील प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स यांनी फ्रिजबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. फ्रिजचा वापर करताना कशी खबरदारी घेणं आवश्यक आहे ते सांगितलं आहे. फ्रिजमध्ये अन्न ठेवताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत ते जाणून घेऊया...
गरम अन्न फ्रिजमध्ये ठेवू नका
तुम्ही तुमच्या वडिलधाऱ्यांकडून अनेकदा ऐकलं असेल की फ्रिजमध्ये गरम अन्न ठेवू नये, याचं कारण म्हणजे त्यामुळे भरपूर वाफ निर्माण होते आणि त्याचे थेंब फ्रीजमध्ये गोठू लागतात, ज्यामुळे आर्द्रता वाढते. फ्रिजमध्ये असलेल्या या आर्द्रतेमुळे, अन्न खराब होऊ शकतं. ज्यामुळे फूड पॉइजनिंग देखील होऊ शकतं. म्हणून, सर्वप्रथम पदार्थ गरम असल्यास त्याचं तापमान आधी नॉर्मल करा आणि नंतर तो फ्रिजमध्ये ठेवा.
कापलेली फळं आणि भाज्या ठेवू नका
बऱ्याच वेळा आपण ताजी फळं आणि भाज्या आधीच कापून फ्रिजमध्ये घट्ट डब्यात साठवून ठेवतो, जेणेकरून सकाळी उठल्यावर ते सोपं जातं, कापण्यासाठी वेळ वाया जात नाही, परंतु ही पद्धत चुकीची आहे. फळं किंवा भाज्या कापून ठेवल्याने त्यातील ओलावा हळूहळू निघून जातो आणि घट्ट डब्यात भरल्यामुळे त्यातील पोषक घटक कमी होऊ लागतात.
प्लास्टिकच्या डब्यांचा करू नका वापर
प्लास्टिक मटेरिअलपासून बनवलेले डबे खूपच स्वस्त आहेत आणि त्यामध्ये अन्न ठेवून ते फ्रीजमध्ये ठेवणं सोपं आहे, परंतु बहुतेक आरोग्य तज्ञ ते वापरू नका असा सल्ला देतात कारण प्लास्टिकमध्ये अन्न साठवल्याने त्यातील पोषक घटक कमी होतात. त्याऐवजी काच किंवा स्टीलच्या डब्यात अन्न ठेवा.