हृदयासंबंधी समस्या असलेल्या लोकांना नेहमीच असे प्रश्न पडत असतात की, हृदय निरोगी ठेवण्यासाठी काय खावं किंवा काय खाऊ नये?, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय करावं? पण हे असे प्रश्न आहेत ज्यांचं उत्तर सोपं नाही. मात्र, आयुर्वेदात या प्रश्नाचं उत्तर आहे.
आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांच्यानुसार, तुम्ही तुमच्या आहारामध्ये काही गोष्टींचा समावेश करून हृदय निरोगी आणि मजबूत करू शकता. काही असे पदार्थ असतात जे शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढवतात. ज्यामुळे वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका वाढतो. असेच उपाय डॉक्टरांनी सांगितले आहेत ज्यांमुळे हृदयरोगांचा धोका कमी होईल आणि बॅड कोलेस्ट्रॉलही कमी होईल.
कोलेस्ट्रॉल कसं होईल कमी?
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी १०० मिलीलिटर पाणी आणि १०० मिलीलिटर दूध घ्या, यात ५ ग्रॅम अर्जुनाच्या सालीचं पावडर, चिमुटभर दालचीनी टाका. हे मिश्रण पाणी अर्ध होईपर्यंत उकडून घ्या. नंतर गाळून हे पाणी सकाळी आणि सायंकाळी जेवणाच्या एक तासाआधी सेवन करा.
याने ब्लडमधील शुगर, ट्रायग्लिसराइड्स, एलडीएल आणि कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत मिळते. अर्जुनाच्या सालीला आयुर्वेदात फार महत्व आहे. याने पित्त दोष, कफ दूर होण्यास मदत मिळते.
ग्रीन टी
ग्रीन टी मध्ये कॅटेचिन असतात आणि यातील अॅंटी-ऑक्सिडेंट्स एलडीएल आणि कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. ग्रीन टी तुम्ही सकाळी १२ वाजताच्या आत सेवन करू शकता. याच्या सेवनाने वजनही कमी होईल आणि कोलेस्ट्रॉलही कमी होईल.
डाळिंब
आयुर्वेदानुसार, डाळिंब हृदयासाठी सगळ्यात चांगलं फळ आहे. याच्या सेवनाने ट्रायग्लिसराइड्स आणि एलडीएलचं प्रमाण कमी होतं. तसेच गुड कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. तुम्ही रोज एक डाळिंब खाऊ शकता.
लसूण
लसूण एक फार महत्वाचा मसाला आहे. आयुर्वेदानुसार, लसूण हृदयासाठी फार फायदेशीर आहे. तसेच शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत राहते. इतकंच नाही तर रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेलं कोलेस्ट्रॉल दूर करण्यास याने मदत मिळते. तुम्ही रोज एकदा रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या १ तास आधी लसणाची एक कच्ची कळी खाऊ शकता.