Methi leaves Benefits : मेथीची भाजी किंवा मेथीच्या दाण्यांचं सेवन लोक वेगवेगळ्या पद्धतीने करतात. मेथीची भाजी तर जास्तीत जास्त लोक नियमितपणे खातात. या भाजीची टेस्ट लहानांसोबतच मोठ्यांनाही आवडते. मेथीच्या भाजीचे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा आहेत. आयुर्वेदात मेथीचा वापर वेगवेगळी औषधं बनवण्यासाठी केला जातो. मेथीमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, आयर्न, फायबर आणि पोटॅशिअम भरपूर असतं. त्यामुळे मेथीची भाजी खाणं अनेक दृष्टीने फायदेशीर ठरतं. तुम्हीही अनेकदा मेथीची भाजी खाल्ली असेल, पण याचे फायदे तुम्हाला माहीत नसतील. तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
मेथीच्या भाजीचे काय काय फायदे होतात याचा एक व्हिडीओ आयुर्वेद डॉक्टर विलास शिंदे यांनी इन्स्टावर शेअर केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, "ताप आला असेल, कफ असेल, थकवा येत असेल तर मेथीची भाजी नियमित खावी. या भाजीने या समस्या दूर होण्यास मदत मिळते".
मेथीची भाजी खाण्याचे इतर महत्वाचे फायदे
१) पचनक्रिया
पचन तंत्रामध्ये काही समस्या असणाऱ्या लोकांसाठी मेथीची भाजी ही खूप फायदेशीर ठरते. कारण मेथीच्या भाजीमध्ये अॅंटी-ऑक्सिटेंड्स आणि फायबर भरपूर असतं. हे दोन्ही तत्व पचनासंबंधी समस्या दूर करण्यास फायदेशीर असतात. तसेच ज्या लोकांना बद्धकोष्ठता, गॅस आणि अपचन अशा समस्या नेहमी होतात त्यांनी मेथीच्या भाजीचं सेवन नियमितपणे केलं पाहिजे.
२) त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
मेथीच्या भाजीच्या सेवनाने केस मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत मिळते. मेथीमधील पोटॅशिअम, आयर्न आणि नायट्रोजनने केस निरोगी राहतात. तसेच मेथीच्या भाजीने त्वचाही चांगली होते.
३) वजन कमी होतं
बऱ्याच लोकांचं वजन वेगवेगळ्या कारणांनी वाढत असतं. अशा लोकांनी मेथीच्या भाजीचं नियमित सेवन करावं. त्यांना वजन कंट्रोल करण्यास मदत मिळेल. कारण यात फायबरचं प्रमाण जास्त असतं. जे अन्न पचन होण्यास मदत करतं. तसेच या भाजीमध्ये कॅलरी कमी असतात. ही भाजी खाल्ल्यानंतर पोट जास्त वेळ भरलेलं राहतं. या भाजीमधील अॅंटी-ऑक्सिडेंट्स मेटाबॉलिज्म बूस्ट करतात. ज्यामुळे फॅट बर्नची क्रिया वेगाने होते. तसेच यातील डायटरी फायबरमुळे लठ्ठपणा कमी करण्यास मदत मिळते.
४) डायबिटीस
डायबिटीसच्या रूग्णांसाठी फायबरचं प्रमाण भरपूर असलेली मेथीची भाजी खूप फायदेशीर ठरते. मेथीच्या भाजीमध्ये अमिनो अॅसिड असतं जे शरीरात ब्लड शुगर लेव्हल कंट्रोल करण्यास मदत करतं. डायबिटीसमध्ये मेथीच्या भाजीचा ज्यूसही फायदेशीर ठरू शकतो.
५) इम्यूनिटी
मेथीच्या भाजीमध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि भरपूर अॅंटी-ऑक्सिडेंट्स असतात जे शरीराचा वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. मेथीच्या भाजीचं नियमित सेवन केल्याने इम्यूनिटी बूस्ट होते आणि यामुळे वेगवेगळे इन्फेक्शन व आजारांपासून बचाव होतो.