Cholesterol Home Remedy : हृदयरोगांचा धोका आजकाल कमी वयातच वाढू लागला आहे. दिवसेंदिवस हृदयरोगाच्या रूग्णांची संख्याही वाढत आहे. शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढल्यावर आणि ब्लड प्रेशर वाढल्यावर हृदयरोगांचा धोका वाढतो. एक्सपर्टही शरीरात बॅड कोलेस्ट्रॉल वाढणं सगळ्यात घातक मानतात. कारण यानेच रक्तवाहिन्या ब्लॉक होतात आणि नंतर हार्ट अटॅक व स्ट्रोकचा धोका वाढतो. अशात शरीरात वाढलेलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आयुर्वेद डॉक्टरांनी एक खास उपाय सांगितला आहे.
आयुर्वेद डॉक्टर दीक्षा भावसार यांनी कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करण्यासाठी खजूर आणि लसूण एकत्र खाण्याचा सल्ला दिला आहे. डॉक्टरांनुसार हा नॅचरल उपाय तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतो. त्यांनी सांगितलं की, या उपायाने त्यांच्या ५०० रूग्णांना कोलेस्ट्रॉल आणि बीपी कंट्रोल करण्यास मदत मिळाली आहे.
कोलेस्ट्रॉलमध्ये खजूर-लसूण खाण्याचे फायदे
डॉक्टरांनी सांगितलं की, खजूर हाय बीपीच्या रूग्णांसाठी फार चांगलं असतं. कारण यात पोटॅशिअमचं प्रमाण अधिक असतं आणि सोडिअमचं प्रमाण कमी असतं. तसेच खजूरमधील फायबर कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतं. याने वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोका कमी होतो. तसेच यातील अॅंटी-ऑक्सिडेंटने शरीराला इतरही अनेक फायदे मिळतात.
कच्चा लसूण खाल्ल्याने काय होतं?
लसणामध्ये ब्लड प्रेशर कंट्रोल करणारे अनेक गुण असतात. त्यामुळे आयुर्वेद डॉक्टरांनी कच्चा लसूण खाण्याचा सल्ला दिला आहे. कच्चा लसूण खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीर आतून साफ होतं. अशात शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल दूर करण्यासही लसणाने खूप फायदा मिळतो.
खजूर आणि लसूण खाण्याची पद्धत
डॉक्टरांनी सांगितलं की, जर तुम्ही बीपी आणि कोलेस्ट्रॉलचे रूग्ण असाल तर २१ दिवस रोज सकाळी रिकाम्या पोटी किंवा जेवणाच्या अर्ध्या तास आधी एका खजुरामध्ये एक लसणाची कळी टाकून खावी. त्यासाठी आधी खजुरातील बी काढावी.