नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अशा 'आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जनआरोग्य योजने'चा लाभ अवघ्या वर्षभरात अनेकांनी घेतला आहे. या योजनेच्या लाभार्थींची संख्या 50 लाखांहून अधिक झाली आहे.
आयुष्मान भारत योजनेंतर्गत देशात प्रत्येक मिनिटाला 9 नागरिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल होत असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या प्रमुख आरोग्य योजनेमार्फत 32 राज्यांत आणि केंद्रशासित प्रदेशांमधील लोकांच्या उपचारासाठी 7,901 कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.
राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरण (एनएचए) च्या आकड्यानुसार, 60 टक्क्यांहून अधिक निधी तृतीय श्रेणीतील उपचारांसाठी खर्च करण्यात आले आहे. तृतीय श्रेणीत ज्या आजारांवर उपचार केले, त्यामध्ये कॉर्डिओलॉजी, ऑर्थोपॅडिक, रेडिएशन, ओंकोलॉजी, कार्डिओ-थोरॅसिक, वॅस्कुलर सर्जरी आणि युरोलॉजी संबंधीत होते.
आयुष्मान भारत योजनेला गुजरात, तामिळनाडू, छत्तीसगड, केरळ आणि आंध्र प्रदेशातील लोकांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, संपूर्ण देशात 18,486 रुग्णालयांमध्ये आयुष्मान भारत योजना राबविली जात आहे. यामध्ये 53 टक्के खासगी आणि मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत. तसेच, 50,000 अधिक पोर्टेबिलिटीची प्रकरणे सुद्धा समोर आली आहे. ज्यामध्ये प्रवासी, तसेच प्रवास करण्यास पात्र असलेल्या लोकांनी आपल्या राज्याच्या बाहेर जाऊन या योजणेमार्फत उपचार करून घेतले आहेत.