Bad digestive system : सतत काही चुकीचं खात राहिल्याने पचन तंत्रावर वाईट प्रभाव पडतो. पचनक्रिया अन्न ऊर्जेत बदलून शरीराला आजारांशी लढण्याची शक्ती देते. पचनक्रिया व्यवस्थित न झाल्यास अन्न पचन होत नाही. त्यामुळे अपचन, गॅस, उलटी, पोटदुखी, पोटात सूज या समस्या होतात. पचनक्रिया बिघडली की, वेगवेगळ्या आजारांचा तुम्हाला सामना करावा लागतो. आज आम्ही तुम्हाला तुमची पचनक्रिया खराब झाल्यावर काय संकेत दिसतात हे सांगणार आहोत. जेणेकरून त्यात तुम्ही वेळीच सुधारणा करू शकाल.
शरीर आणि श्वासांची दुर्गंधी
जेव्हा शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडत नाहीत, तेव्हा शरीरातून दुर्गंधी येऊ लागते. अधिक घाम, पायांची दुर्गंधी हे पचनक्रिया खराब असण्याचे संकेत आहेत. शरीरातून न निघणारे विषारी पदार्थ रक्तप्रवाहात जाऊन त्वचेमध्ये अडकून राहतात. ज्यामुळे शरीराची दुर्गंधी येऊ शकते. अशात शरीरातून डीटॉक्स दूर करणाऱ्या पदार्थाचं सेवन करायला हवं. अनेकदा श्वासांची दुर्गंधी येणे हा सुद्धा पचनक्रिया खराब असण्याचा संकेत आहे. दोन-तीनदा ब्रश करूनही श्वासांची दुर्गंधी जात नसेल तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या.
त्वचेची समस्या
जास्त दिवस पोट खराब राहणे किंवा पोट साफ न होणे ही पचनक्रियेची समस्या आहे. जेव्हा असं होतं तेव्हा त्वचेचं नुकसान होतं. अशावेळी पिंपल्स, सोरायसिस किंवा एक्जिमाची समस्या होऊ शकते. त्यामुळे याकडे दुर्लक्ष न करता वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
केसगळती अधिक होणे
पचनक्रिया खराब झाल्याने केसगळीतही अधिक होते. खराब डायजेशनमुळे केस कमजोर होता. पचनक्रिया खराब असल्याने अन्नातील योग्य पोषण केसांपर्यंत पोहोचत नाही, ज्यामुळे केसगळती, केस पांढरे होणे आणि केस पातळ होणे या समस्या होऊ लागतात.
कमजोर नखे
पचनक्रिया फार जास्त काळासाठी खराब राहिली तर याचा प्रभाव शरीरासह नखांवरही बघायला मिळतो. जेव्हा पचन तंत्र खराब असतं तेव्हा शरीरातील विषारी पदार्थ बाहेर निघू शकत नाहीत. ज्यामुळे वेगवेगळ्या समस्या होतात. यात नखे तुटणे किंवा नखे कमजोर होणे यांचाही समावेश आहे.
पचनक्रिया दुरूस्त करण्याचे उपाय
पचनक्रिया चांगली आणि मजबूत ठेवण्यासाठी हेल्दी आणि पौष्टिक पदार्थांचं सेवन करावं. जास्तीत जास्त फायबर युक्त पदार्थांचा डाएटमध्ये समावेश करावा, जेणेकरून पोट साफ राहील. जेवण चांगलं चावून खावं. घाईघाईने काही खाल तर ते व्यवस्थित पचणार नाही. त्यासोबतच पचनक्रिया चांगली ठेवण्यसाठी नियमित एक्सरसाइज करणेही गरजेचे आहे.