उत्तम आरोग्यासाठीव्यायाम आवश्यक असतो. हृदय, रक्तवाहिन्या तसेच मानसिक आरोग्यासाठी डॉक्टर नियमित व्यायामाचा सल्ला देतात. बहुतांश लोक फिटनेससाठी रोज व्यायाम करतात. एकूण आरोग्यासाठी मध्यम स्वरुपाचा व्यायाम फायदेशीर मानला जातो. पण जास्त व्यायाम केल्यास त्याचा हृदयाच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. त्यामुळे हृदयाचं कार्य चांगलं राहण्यासाठी संतुलित व्यायाम गरजेचा आहे.
नियमित व्यायाम किंवा शारीरिक हालचाली हा निरोगी जीवनशैलीचा आधारस्तंभ मानला जातो. यामुळे हृदय, रक्तवाहिन्यांसह मानसिक आरोग्य चांगलं राहतं. आयुष्य वाढतं. रोज मध्यम स्वरुपाचा व्यायाम करणं फायदेशीर असलं तरी हृदयाच्या आरोग्याचा विचार करून नेमका कोणत्या स्वरुपाचा व्यायाम करावा हे माहिती असणं गरजेचं आहे.
जेव्हा शरीराला पुरेशी विश्रांती न देता शारीरिक क्षमतेपेक्षा जास्त व्यायाम केला तर हृदय आणि रक्तवाहिन्यांसंदर्भात आजार होण्याचा धोका वाढतो. तीव्र स्वरुपाचा व्यायाम केल्यास ओव्हर ट्रेनिंग सिंड्रोमची जोखीम वाढते. जेव्हा एखादी व्यक्ती व्यायामाच्या तणावातून बाहेर येण्यासाठी तिच्या शरीराची क्षमता ओलंडते, तेव्हा तिला तीव्र थकवा जाणवतो आणि तिच्या कार्यक्षमतेत बिघाड होतो.
व्यायामामुळे हृदयाच्या इलेक्ट्रिक सिस्टीममध्ये व्यत्यय निर्माण होऊ शकतो. परिणामी, हृदयाचे ठोके असामान्य होऊ शकतात. जरी हा प्रकार सौम्य आणि स्वयं मर्यादित असला तरी त्यामुळे आर्टिअल फायब्रिलेशन किंवा व्हेंट्रिक्युलर थायकार्डियासारख्या गंभीर समस्येला कारणीभूत ठरू शकतात.