नवी दिल्ली - बनारस हिंदू विद्यापीठातील (Banaras Hindu University) तज्ज्ञ संशोधकांनी कॅन्सरसंदर्भातील उपचारांमध्ये कडुनिंबाच्या झाडाचा उपयोग होऊ शकतो, हे सिद्ध केलं आहे. या संशोधकांनी टी-सेल लिंफोमा (T-cell lymphoma) वरील उपचारांमध्ये निंबोलाइडची (कडुनिंबाच्या झाडाचा एक बायोएक्टिव्ह घटक) इन-व्हिट्रो आणि इन-विवो उपचारात्मक परिणामकारता याविषयी माहिती दिली आहे. रक्तविषयक रोगांवरील उपचारांमध्ये कॅन्सरविरोधी औषध म्हणून निंबोलाइडचं (Nimbolide) महत्त्व त्यांनी सांगितलं आहे. इंटरनॅशनल जर्नलमध्येसुद्धा हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
बीएचयूचे प्रवक्ते राजेश सिंह (Rajesh Singh BHU) यांनी दिलेल्या माहितीनुसार, या संशोधनातून जे नवे निष्कर्ष निघाले आहेत ते अतिशय प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय जर्नल एन्व्हायरमेंटल टॉक्सिकॉलॉजीमध्ये (Environmental Toxicology) दोन भागांमध्ये प्रकाशित झाले आहेत. संशोधक विद्यार्थी प्रदीप कुमार जायसवारा यांनी विशाल कुमार गुप्ता, राजन कुमार तिवारी आणि शिव गोविंद रावत यांच्यासोबत हे संशोधन केलं होतं.
या संशोधनाला यूजीसी स्टार्ट-अप रिसर्च ग्रांट (UGC Start-up Research Grant) द्वारे फंडिंग मिळाले होते. हे संशोधन करणाऱ्या तज्ज्ञांनी सांगितलं की, कडुनिंब (Neem) ही एक पारंपरिक औषधी वनस्पती आहे. या झाडाची फुलं (Flower) आणि पानं (Leaves) परजीवी वनस्पतींच्या वाढीला प्रतिबंध करतात त्याचप्रमाणे ते अनावश्यक जीवाणूंच्या वाढीलाही प्रतिबंध करतात. अनेक आजारांवरील पारंपरिक औषधांमध्ये कडुनिंबाचा आणि त्याच्या विविध घटकांचा उपयोग केला जातो.
कडुनिंबाची पानं आणि फुलांपासून एक वेगळा बायोएक्टिव्ह घटक निंबोलाइड (Nimbolide) वेगळा करण्यात आला आहे, त्याचे अनेक औषधी उपयोग या विषयी संशोधन होऊ लागलं आहे. त्यातून त्याच्या अगणित उपयोगांपैकी काही उपयोग समोर येत आहेत. निंबोलाइडच्या ट्यूमर-विरोधी गुणधर्मांचा उपयोग काही प्रकारच्या कॅन्सरवरील उपचारांमध्ये केला गेला आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.