हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू ही आता अतिसामान्य बाब झाली आहे. झटका आल्यानंतर डॉक्टरांना बोलावणे, रुग्णवाहिकेसाठी फोन करणे आणि रुग्णालयात पोहोचणे याला वेळ लागतो. अनेकवेळा या कालावधीत रुग्ण दगावलेला असतो; परंतु जर या ‘गोल्डन मोमेंट’च्या काळात ‘बेसिक लाईफ सपोर्ट’चा उपचार केला तर रुग्ण वाचण्याची शक्यता बळावते. ‘अॅस्टर आधार’च्या क्रिटिकल केअर युनिटचे विभागप्रमुख डॉ. अमोल कोडोलीकर यांच्याशी याबाबत साधलेला थेट संवाद..प्रश्न : बेसिक लाईफ सपोर्टची नेमकी गरज काय आहे?उत्तर : आधुनिक जीवनशैली, बदललेले कामाचे स्वरूप, व्यायामाचा अभाव यासह अनेक कारणांमुळे भारतातील हृदयविकाराचे प्रमाण वाढलेले आहे. एखाद्याला हृदयविकाराचा झटका आला तर तातडीने जवळच्या, घरगुती, ओळखीच्या डॉक्टरांना फोनवरून बोलावण्याची धावपळ सुरू होते. रुग्णवाहिका बोलावली जाते. घरातील गाडी काढून हॉस्पिटलला जाण्याची तयारी सुरू होते; परंतु अनेकदा हॉस्पिटलपर्यंत येईपर्यंत अशा रुग्णाचा मृत्यू होतो. झटका आल्यानंतरच्या पहिल्या दहा सेकंदामध्ये जर ‘बेसिक लाईफ सपोर्ट’चा उपचार झाला तर हॉस्पिटलपर्यंत रुग्ण नेऊन त्याच्यावर उपचार करण्याची संधी मिळते. त्याचा जीव वाचण्याची शक्यता वाढते म्हणून बेसिक लाईफ सपोर्टची गरज आहे.
प्रश्न : हृदयविकाराचा झटका आल्यानंतर नेमके काय होते?उत्तर : हृदयाला सुरू असलेला रक्तपुरवठा बंद पडला की हृदयविकाराचा झटका येतो. हा रक्तपुरवठा थांबला की पुढच्या टप्प्यात काही सेकंदात मेंदूचा रक्तपुरवठा बंद होतो. काही मिनिटांमध्ये जर मेंदूचा रक्तपुरवठा सुरू झाला नाही तर मेंदूच्यापुन्हा निर्माण होणार नाहीत अशा पेशी मृत होण्यास सुरुवात होते,म्हणूनच हृदयाचा रक्तपुरवठातातडीने सुरू करण्यात यश आले तर मेंदूचीही होणारी संभाव्य हानी टाळता येते.
प्रश्न : बेसिक लाईफ सपोर्टची प्रक्रिया नेमकी कशी आहे?उत्तर : हृदयाचा रक्तपुरवठा बंद झाला की चक्कर येते. घरी, रस्त्यामध्ये, कार्यालयामध्ये कुठेही अशी चक्कर आली की खालीलप्रमाणे प्रक्रिया राबविणे आवश्यक आहे. १) संबंधितांना कठीण भागावर झोपवा. २) संबंधित व्यक्तीला हाक मारा, प्रतिसाद मिळतो की नाही बघा. न मिळाल्यास त्याला चक्कर आली आहे, तो बेशुद्ध आहे असे स्पष्ट होते. त्याला हृदयविकाराचा झटका आला असण्याची दाट शक्यता असते. ३) त्या व्यक्तीच्या नाकाजवळ आपला चेहरा नेऊन त्याचा श्वास सुरू आहे की नाही याची खात्री करून घ्या. श्वास सुरू असल्यास त्याला एका कुशीवर झोपवा. ४) दरम्यानच्या काळात रुग्णवाहिका बोलवा. ५) श्वास बंद असेल तर त्याच्या शेजारी गुडघ्यावर बसून आपले दोन्ही हात एकमेकांवर ठेवून छातीच्या मध्यभागी वरून खाली दाब देऊन पंपिंग करण्यास सुरुवात करावी. संबंधिताच्या शरीरावर ओणवे होऊन पूर्ण ताकदीने मिनिटाला १०० ते १२० वेळा अशा पद्धतीने दाब द्यावा. आपल्या खांद्याचा भार त्याच्या शरीरावर पडेल अशा पद्धतीने जोर देऊन दाब देत राहावे. ६) एकीकडे तीसवेळा पंपिंग केल्यानंतर दुसरीकडे संबंधितांच्या तोंडावर आपले तोंड ठेवून जोरात फुंकर मारणे आणि पुन्हा पंपिंग सुरू करणे. (हा पर्याय संबंधितांशी तुमची जवळीक, तत्कालीन परिस्थिती यावर अवलंबून ठेवावा.) ७) अगदी रुग्णवाहिकेतूनही जाताना अशा पद्धतीने बेसिक लाईफ सपोर्ट देत राहावे.
प्रश्न : अशा पद्धतीने उपचार केल्यानंतर रुग्णांचा जीव वाचण्याचे किती प्रमाण आहे?उत्तर - आपल्याकडे अजूनही तशी आकडेवारी नोंद नाही. मात्र, परदेशात हे प्रमाण ५० ते ५५ टक्क्यांपर्यंत आहे. रुग्णालयात विविध रुग्णांवर उपचार सुरू असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आल्यास त्यांना आम्ही तातडीने बेसिक लाईफ सपोर्ट देतो. त्यामुळे त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात दाखल करेपर्यंत त्यांचे हृदय सुरू राहते. परिणामी त्यांना जीवनदान मिळते अशी अनेक उदाहरणे सांगता येतील.आमच्या हॉस्पिटलमधील एका माजी कंपौंडरच्या मुलीने परीक्षेत चांगले गुण मिळाले नाही म्हणून विष घेतले होते. त्याला ही सिस्टीम माहिती होती. त्याने रुग्णवाहिकेतूनही बेसिक लाईफ सपोर्ट सिस्टीम राबविली आणि त्या मुलीचा जीव वाचला. आज ती विवाहानंतर अतिशय चांगले जीवन जगत आहे.
प्रश्न : घरोघरी ही माहिती का दिली जावी असे वाटते?उत्तर : अनेकवेळा घरात असताना नागरिकांना हृदयविकाराचा झटका येतो. शौचाला गेल्यानंतर हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे शौचाला गेल्यानंतर कुंथू नये, जोर देऊ नये. एकवेळ शौचाला झाले नाही तरी चालेल, परंतु कुंथू नये. शौचाला सुलभ व्हावे यासाठी विविध औषधे आहेत. कारण कुंथल्यानंतर हृदयावर जास्त दाब पडतो. आतल्या आत हृदयविकाराचा झटका येऊन जातो. प्रथमोपचार करता येत नाहीत आणि मग दार फोडून संबंधितांना बाहेर काढावे लागते. घरोघरी हे प्रकार होत असल्याने ही घरोघरी माहिती आवश्यक आहे.
प्रश्न : ही माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी काय प्रयत्न सुरू आहेत?उत्तर : आम्ही ‘अॅस्टर आधार’तर्फे एक लाख नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यासाठी नियोजन केले आहे. गेल्या सहा महिन्यांत आम्ही १० हजारजणांना हे प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले आहे. अगदी कोल्हापूरच्या पोलीस दलापासून ते एअर पोर्ट अॅथारिटीपर्यंतआमची प्रशिक्षणे सुरूआहेत. आमच्याशी संपर्क साधल्यास हे प्रशिक्षण देण्यासाठीचीआमची टीम तिथे जाऊन प्रशिक्षण देईल.- समीर देशपांडे .